ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी निवृत्तीवेतनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:37 AM2021-09-17T04:37:48+5:302021-09-17T04:37:48+5:30
राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. ...
राजापूर : महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागातून सेवानिवृत्त झालेल्या जिल्ह्यातील सेवानिवृत्तधारकांना गेल्या आठ महिन्यांपासून निवृत्तीवेतनच मिळालेले नाही. त्यामुळे ऐन वार्धक्याच्या कालखंडात त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून जाणीवपूर्वक ज्येष्ठ नागरिकांना निवृत्तीवेतनासाठी वेठीस धरण्यात येत असल्याचा आरोप सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागात अठ्ठावीस ते बत्तीस वर्षे सेवा करून निवृत्त झाले आहेत. हे कर्मचारी सध्या सेवानिवृत्तीचे जीवन जगत आहेत. यातील अनेकांनी आता वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. अशा वृद्धापकाळात आजारपण आणि जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या काळात त्यांच्यासाठी निवृत्तीवेतन आधार बनलेला असताे. वृद्धापकाळात औषधांसाठी निवृत्तीवेतन उपयाेगी ठरते. पण, सध्या निवृत्तीवेतनच मिळत नसल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमाेर पडलेला आहे. रत्नागिरी जिल्हा परिषद सेवानिवृत्तीवेतनाबाबत संवेदनशील नसल्याचे सेवानिवृत्तांचे म्हणणे आहे.
रखडलेल्या सेवानिवृत्त वेतनाबाबत रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून थातूरमातूर उत्तरे देऊन बोळवण केली जात असल्याचे सेवानिवृत्तधारकांचे म्हणणे आहे. सध्या वृद्धापकाळामुळे शासनदरबारी फेऱ्या मारणे, ही प्रकृतीच्या कारणास्तव शक्य नाही. त्यामुळे सेवानिवृत्तांची निवृत्तवेतनासाठीची ससेहोलपट थांबवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.