अर्जुना नदीत भराव टाकल्याने प्रवाह बदलण्याचा धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:23 AM2021-06-05T04:23:46+5:302021-06-05T04:23:46+5:30
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून ...
राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर उभारण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मातीचा मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला होता. त्यातून नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलल्याने त्या परिसरामध्ये शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव रस्त्याला धोका निर्माण झाला आहे. मात्र, त्या ठिकाणी रिटेलिंग वॉल (संरक्षण भिंत) बांधण्याचे चौपदरीकरण करणाऱ्या ठेकेदार कंपनीने गतवर्षी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही.
गोठणेदोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडण्यासाठी शीळ-गोठणेदोनिवडे-चिखलगाव-सौंदळ रस्ता महत्त्वाचा आहे़. हा रस्ता पुढे कोल्हापूर भागाला जोडला जात असल्याने घाटमाथ्यावरून येण्या-जाण्यासाठी ‘शॉर्टकट’ मार्ग म्हणून उपयुक्त ठरत आहे. मात्र, दरवर्षी पावसाळ्यामध्ये अर्जुना नदीला पूर येऊन नदीच्या वाढणाऱ्या पाण्याखाली हा रस्ता सातत्याने राहतो. त्यातून, पंचक्रोशीतील गावांचा पावसाळ्यामध्ये अनेकवेळा संपर्क तुटतो. शासकीय कामांसह वैद्यकीय उपचारांसाठी शहरामध्ये येणे मुश्किल होते. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये अर्जुना नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी नदीपात्रामध्ये मोठ्याप्रमाणात भराव टाकण्यात आला आहे. या भरावामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह बदलला असून, त्याचा फटका त्या परिसरातील या रस्त्याला बसला आहे.
दरम्यान, गतवर्षी पंचक्रोशी ग्रामविकास समितीने या रस्त्याच्या धोक्याकडे लक्ष वेधल्यानंतर त्याची लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी झाली होती. या पाहणीवेळी पुलाच्या बांधकामाच्या परिसरामध्ये नदीच्या बाजूने रिटेलिंग वॉल वा संरक्षण भिंत बांधून देण्याचे पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने आश्वासित केले होते. यावर्षीच्या पावसाळ्यापूर्वी त्याचे बांधकाम होण्याचे अपेक्षित होते. मात्र, यावर्षीचा पावसाळा सुरू झाला तरी, अद्यापही त्या संरक्षण भिंतीचा पत्ता दिसत नाही. त्याबद्दल लोकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.