कमी मनुष्यबळामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:31 AM2021-04-08T04:31:26+5:302021-04-08T04:31:26+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. कोरोना होऊ नये ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून आरोग्य यंत्रणा चांगलीच कामाला लागली आहे. कोरोना होऊ नये म्हणून सरकारने लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. संगमेश्वर तालुक्यात या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, नियमित कामाचा डोलारा सांभाळून, कोरोना रुग्णांच्या सान्निध्यातील शोध घेण्याबरोबरच कोविड लसीकरणाचे काम करताना कमी मनुष्यबळामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांची रात्रंदिवस खूपच धावपळ होत असल्याचे चित्र तालुक्यात सध्या दिसत आहे.
संगमेश्वर तालुका भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला आणि डोंगरदऱ्यात वसलेला आहे. यामुळे काही भागांत वाहतुकीची साधने मर्यादितच आहेत. अशा ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला सरकारी दवाखानेच वरदान ठरत आले आहेत. कोरोना महामारीच्या या कठिण काळात याच सरकारी आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आल्या आहेत. मनुष्यबळ कमी असले तरीही आरोग्य यंत्रणेने सुटीच्या दिवशीही आपली जबाबदारी पार पाडली आहे. कमी कर्मचाऱ्यांमुळे अतिरिक्त कामाचा भारदेखील त्यांनी पेलला आहे.
संगमेश्वर तालुक्यात ११ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि दोन ग्रामीण रुग्णालये आहेत. तालुक्यातील १९६ गावांतील जनतेसाठी अजून एखाद्या ग्रामीण रुग्णालयाची आणि दोन-तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज निर्माण झाली आहे. सध्या अकरा प्राथमिक आरोग्य केंद्रांचा विचार करता तब्बल ८६ विविध महत्त्वाची पदे रिक्त आहेत. गरोदर माता नियमित लसीकरण, विविध राष्ट्रीय कार्यक्रम, अत्यावश्यक सेवा याव्यतिरिक्त कोविड पॉझिटिव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, चाचणीकरिता नमुने घेणे याबरोबरच सध्या कोविड लसीकरण करणे आदी कामे करताना मनुष्यबळाअभावी कठिण पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
सध्या अकरा केंद्रांत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे पूर्ण भरलेली आहेत. आरोग्य साहाय्यिकांच्या मंजूर २२ पदांपैकी ६ रिक्त, आरोग्य सेवक ५५ मंजूर पदांपैकी २६ रिक्त, आरोग्य सेविका १०४ पैकी ३४ पदे रिक्त याबरोबरच औषध निर्माण अधिकारी ११ पैकी ५ रिक्त आणि प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी ११ मंजूरपैकी तब्बल १० पदे रिक्त आहेत. सफाई कामगार ११ पैकी १ रिक्त आणि स्त्री परिचर ११ पैकी ४ रिक्त अशी एकूण ८६ पदे रिक्त आहेत आणि म्हणूनच लसीकरण करताना कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे.
तालुक्यात सोमवारपर्यंत ९,५२७ नागरिकांना पहिला डोस तर १,६७१ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेकडे लसीचा साठा योग्यरीतीने ठेवण्यासाठी शीतसाखळीदेखील चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे. तालुक्याचे लसीकरणाचे उद्दिष्ट ६८ हजार ४७९ एवढे आहे. त्यामध्ये ४५-५९ मधील वयोगटातील २७,८३१, व्याधीग्रस्त ८,२२० तर ६० वर्षांवरील ३२,४२८ अशा एकूण ६८,४७९ लाभार्थींचा समावेश आहे.
सध्या संगमेश्वर आणि देवरुख या दोन ग्रामीण रुग्णालयांत आणि ११ प्राथमिक आरोग्य केंद्रात तर काटवली आणि तुळसणी येथील उपकेंद्रात अशा १५ ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू आहे.
लसीकरण सुरू आहे तरीदेखील दुसऱ्या टप्प्यातील कोविडच्या या लाटेत संक्रमण आणि तीव्रता अधिक आहे. यामुळे कोविड रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचेच आहे. म्हणूनच प्रत्येकाने मास्क वापरावा, अशी कळकळीची विनंती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. एस. सोनावणे यांनी नागरिकांना केली आहे. तसेच त्या म्हणाल्या की, कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका (जसे की टेस्ट किट फॉल्टी आहेत) असे काहीही नाही. मात्र, या वेळचा धोका पहिल्यापेक्षा अधिक वाटतो म्हणूनच स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे. तालुक्यात पल्स पॉझिटिव्हचे प्रमाण नगण्य आहे. आपल्या विभागाचे कर्मचारी एक वर्षापासून युद्धपातळीवर काम करत आहेत.