संचारबंदी काळात एस. टी. कामगारांचे प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:33 AM2021-05-06T04:33:56+5:302021-05-06T04:33:56+5:30
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देत असली तरी एस.टी.चे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी रत्नागिरी ...
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळ सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा देत असली तरी एस.टी.चे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. त्यासाठी रत्नागिरी आगाराचे आगार व्यवस्थापक दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना एकत्र बोलावून प्रबोधन करीत आहेत. कोरोनामुळे संचारबंदीचे आदेश असताना दहा बाय दहाच्या खोलीत दहा ते पंधरा कर्मचाऱ्यांना बोलावून मार्गदर्शन सुरू आहे. यामुळे प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली होत असून, कोरोना संसर्गाची भीतीही व्यक्त केली जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाला अत्यावश्यक सेवा म्हणून लाॅकडाऊनमधून वगळण्यात आले असले तरी प्रवासी भारमानाअभावी एस. टी. आर्थिक संकटात आहे. त्यामुळे कोरोना संकट काळातही एस. टी.चे कर्मचारी जिवाची काळजी न करता सेवा बजावत आहेत. विभागीय पातळीवर कोरोना काळात कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची काळजी, रुग्णालय, रुग्णवाहिका, उपचाराची आवश्यकता तसेच बाधित कर्मचाऱ्यांनी न घाबरता उपचार घ्यावेत यासाठी प्रबोधन व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना तत्काळ सेवा उपलब्ध व्हावी यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली असली तरी उत्पन्नवाढीच्या प्रबोधनाकरिता कोणतीही समिती स्थापन केलेली नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, रत्नागिरी आगारात असे प्रबोधनवर्ग भरवले जात आहेत.
गेले दहा - बारा दिवस रत्नागिरी आगारात प्रबोधनवर्ग सुरू आहे. दहा / बारा बायच्या खोलीत उत्पन्न वाढीसाठी स्वत: आगार व्यवस्थापक मार्गदर्शन करीत आहेत. कर्मचाऱ्यांनी प्रबोधनवर्ग नियमात आहे का, याबाबत विचारणा केली असता, सार्वजनिक वाहतूक सेवा असल्याचे सांगितले जात असून, कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली जात आहे. मात्र, या प्रबोधन वर्गामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने सर्वत्र कडक निर्बंध जारी केले असताना, रत्नागिरी आगार व्यवस्थापकांना प्रबोधन वर्ग घेण्याची परवानगी कोणी दिली आणि त्यामुळे कर्मचारी बाधित झाले तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न कर्मचारी करत आहेत.