एस. टी.ची हंगामी भाडेवाढ १ पासून, सर्व गाड्यांचा प्रवास महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:37 PM2018-10-20T12:37:11+5:302018-10-20T12:39:18+5:30
दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.
रत्नागिरी : दीपावलीच्या सुट्टीत प्रवाशांची गर्दी बऱ्यापैकी असते. एस. टी.ला होणारा तोटा भरून काढण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी वीस दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ करण्यात येणार असून दि. १ ते २० नोव्हेंबर अखेर दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढीच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार २१ नोव्हेबरपासून भाडेवाढ आकारली जाणार आहे.
रत्नागिरी विभागाचे महिन्याचे उत्पन्न ३० कोटीच्या घरात आहे. वीस दिवसातील भाडेवाढीमुळे उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ होणार आहे. साध्या, मिडी व जलद गाडीसाठी प्रतिस्टेज ७ रूपये ४५ पैसे दर आकारण्यात येतो. भाडेवाढीनंतर हा दर ८ रूपये २० पैसे होणार आहे.
रातराणी गाडीसाठी प्रतिस्टेज ८ रूपये ८० पैसे दर आहे तो ९ रूपये ७० पैसे होणार आहे. निमआराम गाडीसाठी प्रतिस्टेज १० रूपये १० पैसे दर आहे तो ११ रूपये १० पैसे होणार आहे. वातानुकूलित बससाठी ८ रूपये ६० पैसे असलेला दर ९ रूपये ९० पैसे होणार आहे.
वातानुकूलित शिवशाही (आसनी) १० रूपये ५५ पैसे ऐवजी ११ रूपये ६० रूपये होणार आहे. वातानुकूलित शिवशाही (शयनी) साठी प्रतिस्टेज १५ रूपये २० पैसे दर आहे. मात्र दरवाढ न केल्याने तेच दर राहणार आहेत.
इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाकडून वारंवार तिकीट दरात वाढ केली जात नाही. दिवाळीच्या सुट्टीत सहल व पर्यटनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. तोटा भरून काढण्यासाठी गतवर्षी हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती.
दिवाळी सणातील सलग चौथ्या वर्षी वाढ केली जाणार आहे. महामंडळाने १ ते २० नोव्हेंबर अखेर हंगामी भाडेवाढीचा निर्णय घेतला आहे. दिवाळीचा हंगाम संपल्यानंतर २० च्या मध्यरात्री पासून पुन्हा मूळ प्रतिटप्पा दराने भाडे पूर्ववत करण्यात येणार आहे.
एसटीतून प्रवास करणाऱ्यांमध्ये पासधारकांची संख्याही लक्षणीय आहे. मासिक, त्रैमासिक पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार नाही. मूळ रकमेच्या प्रवासातूनच प्रवासी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक प्रवास करु शकतात. केवळ रोखीने किंवा तिकीट काढून प्रवास करणाऱ्यांना हंगामी तिकीटवाढ लागू केली जाणार आहे. त्यामुळे पासधारकांना दिलासा मिळाला आहे.
राज्य परिवहन महामंडळाने हंगामी तिकीट दरवाढ एकाचवेळी राज्यात जाहीर केली आहे. सर्वत्र दहा टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अंमलबजावणी देखील एकाच दिवसापासून सुरू होणार आहे. वीस दिवसाच्या हंगामी भाडेवाढीनंतर पुन्हा पूर्ववत दर ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे दि.२१ नोव्हेंबरपासून जुने तिकीटदर होणार आहेत.
हंगामी भाडेवाढीचे चौथे वर्ष
राज्य मार्ग परिवहन महामंडळाला लवचिक भाडेवाढीबरोबरच कमी करण्याचाही अधिकार आहे. इंधनाच्या दरातील चढ-उतार विचारात घेता महामंडळाने तिकीट दर स्थिर ठेवले असले तरी दरवर्षी दिवाळीत हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावर्षी दिवाळीतील हंगामी तिकीटवाढीचे चौथे वर्ष आहे. महामंडळाने २०१५ मध्ये दिवाळीच्या सु्टीत पहिल्यांदा हंगामी भाडेवाढ केली होती. त्यानंतर २२ आॅक्टोबर ते १४ नोव्हेंबर (२०१६) पर्यंत चार टप्प्यात भाडेवाढ लागू केली होती. गतवर्षी दि. १४ ते ३१ आॅक्टोबर (२०१७) अखेर भाडेवाढ केली होती.
भाडेवाढीवर मर्यादा
२२ आॅगस्ट २०१४ रोजी नियमित भाडेवाढ करण्यात आली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधी योजनेची अंमलबजावणी १ एप्रिल २०१६ च्या मध्यरात्रीपासून सुरू झाली. या योजनेतंर्गत प्रत्येक तिकिटधारी प्रवाशाकडून एक रुपया शुल्क आकारले जाते. यावर्षी दि.१५ जून २०१८च्या मध्यरात्री १८ टक्के भाडे वाढ करण्यात आली.
दहा टक्के भाडेवाढ
यावर्षी दिवाळीतील हंगामी भाडेवाढ करताना सर्वप्रकारच्या एस. टी. गाड्यांतील प्रवासाचे तिकीटदर दहा टक्क्याने वाढविण्यात आले आहेत. प्रतिस्टेज तिकीटदरात वाढ करण्यात आली आहे.