एस. टी. महामंडळाकडे मोठी दरवाढ, अॅपवर मात्र घसघशीत सूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 02:01 PM2019-03-09T14:01:25+5:302019-03-09T14:06:10+5:30
एस. टी. महामंडळाची तिकीटे त्यांच्या महामंडळापेक्षा अन्य ठिकाणी विशेष करून खासगी ठिकाणीच स्वस्त मिळू लागली आहेत आणि तीही काही एक वा दोन रुपयांनी नव्हे तर १००-१२५ रुपयांनी!
विहार तेंडुलकर
रत्नागिरी : जेथे पिकतं, तेथे ते महाग मिळतं, असं म्हटलं जातं. पूर्वी हे काही वस्तूंच्या बाबतीत आणि खासगी क्षेत्रातच लागू होतं. मात्र आता ते शासकीय क्षेत्रातही हळूहळू लागू होत आहे. कारण एस. टी. महामंडळाची तिकीटे त्यांच्या महामंडळापेक्षा अन्य ठिकाणी विशेष करून खासगी ठिकाणीच स्वस्त मिळू लागली आहेत आणि तीही काही एक वा दोन रुपयांनी नव्हे तर १००-१२५ रुपयांनी!
मध्यंतरी एस. टी. महामंडळाने १८ टक्के एवढी घसघशीत दरवाढ करून प्रवाशांचा खिसा रिकामा केला. त्यामुळे एकीकडे प्रवाशांची एस. टी. महामंडळावर नाराजी आहे. मात्र तरीही सुरक्षित सेवा असल्याने अनेक प्रवाशी आजही एस. टी. महामंडळाच्या बसेसमधूनच प्रवास करतात आणि आता एस. टी.नेही वातानुकुलित, शयनयान बसेस सुरु केल्याने प्रवासी पुन्हा या सेवेकडे वळू लागले आहेत.
एस. टी. महामंडळाचे आरक्षण हे रेडबस, पेटीएम अशा मोबाईल अॅपवरही मिळत असले तरी अनेकजण एस. टी. महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटवरून किंवा बसस्थानकावर जाऊन करणे पसंद करतात. मात्र, एस. टी. महामंडळाच्या वेबसाईट वा प्रत्यक्ष बसस्थानकावर जाऊन आरक्षण केल्यास प्रवाशांची लूट होत असल्याचे समोर आले आहे. कारण, सामान्यपणे एस. टी. महामंडळाच्या वेबसाईटवर वा तिकीट खिडकीवर कमी दरात आरक्षण मिळणे अपेक्षित होते. मात्र परिस्थिती याउलट आहे.
पेटीएम, रेडबस अशा अॅपवर जाऊन जर एस. टी. महामंडळाच्या बसेसचे आरक्षण केल्यास ते स्वस्तात उपलब्ध होते तर महामंडळाकडे जाऊन आरक्षण केल्यास ते महाग पडते. फक्त खासगी अॅपवर जाऊन आरक्षण करायचे म्हटले तर ते ठराविक विशेष करून लांबपल्ल्याच्या गाड्यासाठीच करता येते.
मात्र असे असले तरी बोरिवली वा मुंबई सेंट्रल पर्यंतचा प्रवास एस. टी. बसने करायचा म्हटला तर एस. टी.ची वेबसाईट वा तिकीट खिडकीवरील दर आणि पेटीएम वा रेडबस या अॅपवरील दर यामध्ये ८४ ते ११८ रुपयांचा फरक पडतो. त्यामुळे, पिकते तेथे गोष्ट महागच मिळते, या सामान्यांच्या समजाला आता एस. टी. महामंडळाने खतपाणीच घातले आहे, असे म्हणावे लागेल.
गाडी एस. टी. पेटीएम रेडबस
शिवशाही ७१३ ५९५ ६३०
शयनयान
(मुुंबई)
साधी गाडी ४६९ ३८५ ३९५
(बोरिवली)
शिवशाही ६९६ ५४० ५३०
(बोरिवली)