ST Strike : रत्नागिरी विभागीय कार्यशाळा अधिकाऱ्यांच्या तत्परतेमुळे टळला लाखोंचा खर्च, लढवली 'ही' शक्कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 05:18 PM2021-12-02T17:18:59+5:302021-12-02T17:24:33+5:30
जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली.
मेहरुन नाकाडे
रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस. टी. कर्मचाऱ्यांचे ‘कामबंद ’ आंदोलन सुरू आहे. गेले तीन आठवडे चालक, वाहक, कर्मचारी आंदोलनात सहभागी आहेत. जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होण्याचा संभाव्य धोका टाळण्यासाठी विभागीय कार्यशाळेच्या अधिकारी, पर्यवेक्षकांनी याबाबत दक्षता घेतली. दररोज एसटी काही मिनिटे सुरू करणे, कार्यशाळेत एक फेरी मारणे या प्रकारामुळे विभागातील सर्व गाड्या सुस्थितीत असल्याने लाखोंचा खर्च टळला आहे.
जास्त दिवस एस. टी. बंद राहिल्यास इंजिन लाॅक होणे, बॅटरी उतरणे, एअरकंडीशन गाड्यांच्या एसी नादुरुस्त होणे याशिवाय गाडी सहज सुरू न होता धक्का मारून सुरू करण्याची समस्या उद्भवली असती. रत्नागिरी विभागात ६०६ गाड्या असून, देखभाल-दुरुस्तीसाठी लाखो रुपयांचा खर्च करावा लागला असता. मात्र हा खर्च अधिकारी, पर्यवेक्षकांच्या तत्परतेमुळे टळला आहे.
जिल्ह्यातील आगार आणि बसेसची संख्या
मंडणगड ४१
दापोली ६४
खेड ६९
चिपळूण ९०
गुहागर ६४
देवरुख ६४
रत्नागिरी ११७
लांजा ४०
राजापूर ५७
जिल्ह्यात बसेसच्या केवळ २०८ फेऱ्या
मंडणगड, रत्नागिरी आगारात कडकडीत बंद
उर्वरित सात आगारात एसटी वाहतूक काही अंशी सुरू
विभागात दिवसभरात अवघ्या २०८ फेऱ्या धावल्याने पावणे दोन हजार प्रवाशांनी प्रवास केला.
ग्रामीण भागातील प्रवाशांची एसटी बंद असल्यामुळे गैरसोय होत आहे.
बंदमुळे कोट्यवधीचे नुकसान
केवळ ४८३ कर्मचारी कामावर
रत्नागिरी विभागात प्रशासकीय, कार्यशाळा, चालक, वाहक, चालक तथा वाहक मिळून एकूण ३७७९ एस. टी. कर्मचारी आहेत.
पावणेचार हजार एस. टी. कर्मचाऱ्यांपैकी ४८३ कर्मचारी कामावर हजर असून ५२ कर्मचारी अधिकृत रजेवर आहेत.
एकूण ३२४४ कर्मचारी प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी झाले असल्यामुळे एस. टी. वाहतूक कोलमडली आहे. प्रशासकीय, कार्यशाळेच्या कर्मचारी उपस्थितीचे प्रमाण अधिक आहे.
आतापर्यंत ४५८ जणांवर कारवाई
रत्नागिरी विभागात ३०३ कंत्राटी कर्मचारी आहेत.
एकूण २४९ कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली होती.
कामावर हजर न झाल्याने एकूण २३३ कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केली आहे.
आतापर्यत २२५ कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने कामावर हजर होण्याचे सूचित केले होते.
त्यापैकी केवळ बारा कर्मचारी हजर झाले असून प्रशासनाकडून कामावर रुजू करून घेतले आहे.
मेंटेनन्सचा लाखोंचा खर्च वाचला
बॅटऱ्या निकामी होण्याचा धोका टळला आहे.
इंजीन लाॅक होऊ नये, यासाठी काही वेळ इंजीन सुरू ठेवले जाते.
कार्यशाळेच्या आवारात एक फेरी मारली जात असल्याने इंजीन सुस्थितीत राहिली आहेत.
तत्परतेमुळे लाखोंचा खर्च वाचला.
लाॅकडाऊन काळातही एस. टी.चे नुकसान होऊ नये यासाठी दररोज इंजिन सुरू ठेवून फेरी मारण्यात येत होती. त्याप्रमाणेच संपकाळात काळजी घेण्यात आली आहे. कर्मचारी नव्हते, त्यावेळी पर्यवेक्षक, अधिकारी स्वत: इंजिन सुरू करीत असत. मात्र, आता काही कर्मचारी हजर झाल्याने एस. टी.चे इंजिन सुरू करणे, बंद करणे, फेरी मारणे करीत असल्याने देखभाल दुरुस्तीसाठी करावा लागणारा लाखोंचा खर्च यामुळे वाचला आहे. - प्रमोद जगताप, यंत्र अभियंता (चालन)