ST Strike : एस. टी. अत्यावश्यक सेवा, मेस्मा लागू शकतो - परिवहन मंत्री अनिल परब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2021 12:54 PM2021-12-16T12:54:35+5:302021-12-16T13:13:42+5:30
एस. टी. ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती अत्यावश्यक सेवा असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे
रत्नागिरी - एस. टी. ही सर्वसामान्य माणसांसाठी आहे. ती अत्यावश्यक सेवा असल्याने संपकरी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे यासाठी मेस्मा कायदा लावता येऊ शकतो. त्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रत्नागिरीत सांगितले.
कोणी नेता नसल्याने संपकरी कर्मचारी भरकटले आहेत. त्यांचे वकील गुणवंत सदावर्ते त्यांना सांगत आहेत की २० तारखेला विलिनीकरणाचा निर्णय होईल. पण ते हे कशाच्या आधारे बोलत आहेत, हे माहिती नाही. त्या दिवशी न्यायालयाला समितीचा अहवाल सादर होईल. निर्णय होणार नाही, असेही मंत्री परब म्हणाले.
मंत्री परब आज, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आहेत. सकाळच्या सुमारास त्यांनी प्रसिध्द गणपतीपुळे येथील श्री गणपतीचे दर्शन घेत गरीब जनतेची नाळ असलेली एसटी लवकरात लवकर पूर्ववत व्हावी यासाठी गणरायाला साकडे घातले.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून संप पुकारला आहे. यामुळे एसटीची सेवा पुर्णता कोलमडली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे प्रवासांचे हाल होत आहेत. तर दुसरीकडे खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवासांची लुट होत असल्याचे समोर आले आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ करुन हा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न केला. तर कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी वारंवार सरकारने आवाहन देखील केले. तरी देखील कर्मचारी एसटी विलिनीकरणाच्या आपल्या मागण्यावर ठाम आहेत. यामुळे पुन्हा एकदा सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला आहे.