एस. टी. कर्मचाऱ्यांचा कुटुंबासमवेत आक्रोश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 03:17 PM2020-11-10T15:17:31+5:302020-11-10T15:18:03+5:30
एस. टी. कर्मचार्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचार्यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी एस. टी. कर्मचार्यांनी सोमवारी आपापल्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन केले.
रत्नागिरी : एस. टी. कर्मचार्यांना मागील तीन महिन्यांपासून पगारापासून वंचित राहावं लागलं आहे. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना या कर्मचार्यांना मात्र मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत शासन दरबारी न्याय मागण्यासाठी आणि वेतनाचा प्रश्न सोडवण्यासाठी एस. टी. कर्मचार्यांनी आपापल्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश आंदोलन केले.
पगाराची तारीख उलटूनही एस. टी. कर्मचार्यांच्या खात्यात पगाराची रक्कम जमा झालेली नाही. सातत्याने तीन महिने हाच प्रकार सुरु असल्यामुळं सणावाराच्या दिवसांमध्ये कर्मचार्यांपुढे मोठी अडचण उभी राहिली आहे. कोरोना महामारीमध्ये एस. टी. कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून रात्रं-दिवस आपले कर्तव्य बजावत आहेत.
बेस्टमधील कर्मचार्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे १५ हजार ५०० व १० हजार १०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. परंतु, एस. टी. कर्मचारी राज्यभर अत्यावश्यक सेवेमध्ये काम करत असूनही त्यांना तीन महिन्यांचे वेतन अद्यापही मिळालेले नाही. दिवाळीचा सण तोंडावर आलेला असतानाही प्रशासनाने कर्मचार्यांच्या वेतनाबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. संघटनेने वारंवार पत्रव्यवहाराद्वारे पाठपुरावा करूनही त्याची दखल एस. टी. प्रशासनाने घेतलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष वाढला असून, प्रलंबित वेतन मिळण्यासाठी सोमवारी ९ नोव्हेंबर रोजी कर्मचार्यांनी आपल्या घरी कुटुंबासह आक्रोश व्यक्त केला.
दिवाळीपूर्वी एस. टी. कर्मचार्यांना 3 महिन्यांचे थकीत वेतन, थकीत महागाई भत्ता, सण उचल न मिळाल्यास एस. टी. प्रशासनाने वेतन कायदा व कामगार करारातील तरतुदीचा भंग केल्याबद्दल संघटनेमार्फत प्रशासनाविरोधात मुंबई येथील औद्योगिक न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे.