एस. टी.वर जप्तीची कारवाई शक्य
By admin | Published: April 5, 2016 12:37 AM2016-04-05T00:37:17+5:302016-04-05T00:37:17+5:30
रत्नागिरी नगर परिषद : घरफाळा वसुली ९५ टक्के, पाणीकर वसुली ९६ टक्के
रत्नागिरी : शहरी बस वाहतुकीत किती तोटा झाला हा रत्नागिरी नगर परिषदेचा विषय नाही. त्यामुळे एस. टी.च्या रत्नागिरीतील मालमत्ता करापोटी असलेली २ लाख १९ हजार रुपये थकबाकी त्यांच्या तोट्यातून वजा करणे व उर्वरित रक्कम एस. टी. महामंडळाला देण्याचा प्रश्नच येत नाही. एस. टी.ने मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यास जप्तीची कारवाई करणे भाग पडेल, असा इशारा नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
रत्नागिरी शहरात राज्य परिवहन महामंडळामार्फत शहरी बस वाहतूक चालविली जाते. या वाहतुकीतून महामंडळाला १ कोटी ८७ लाखांचा तोटा झाला असून, त्यातून एस. टी.चा मालमत्ता कर वजा करून उर्वरित तोट्याची रक्कम महामंडळाला द्यावी, असे पत्र रत्नागिरीचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांनी नगर परिषदेला पाठविले आहे. मात्र, शहरी बस वाहतुकीच्या फायद्याशी वा तोट्याशी पालिकेचा संबंध नाही. त्यामुळे मालमत्ता कराची थकबाकी ही महामंडळाला पालिकेकडे भरावीच लागणार आहे. अन्यथा कारवाई करणे भाग पडेल, असे मयेकर म्हणाले.
रत्नागिरी नगर परिषदेची २०१५-१६ या आर्थिक वर्षात घरफाळा वसुली ९५.१८ टक्के झाली आहे. शहरात २४ हजार २८८ मालमत्ता आहेत. या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची मागणी ६ कोटी ७३ लाख ८३ हजार रुपये होती. त्यातील एकूण सर्वसाधारण करवसुली ५ कोटी ६८ लाख २ हजार व शासकीय आणि न्यायालयाचा कर ७३.३५ लाख मिळून ६ कोटी ४३ लाख ३७ हजार एवढी मालमत्ता कराची वसुली झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वसुली १.८९ टक्के अधिक आहे. या वसुलीसाठी मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली करनिरीक्षक एकनाथ ठाकूर यांच्या पथकाने चांगले काम केल्याचे मयेकर यांनी सांगितले.
नजिकच्या काळात मालमत्ता कर येणार आहे. त्यामध्ये सरकारी येणे ३० लाख ९६ हजार, न्यायालयीन रक्कम येणे-२८ लाख ४२ हजार, प्रांत अपिले-६२ हजार यांचा समावेश आहे. १५ मालमत्ता १३ लाख ३५ हजार एवढ्या कर थकबाकीमुळे सील करण्यात आल्या आहेत. या वसुलीसाठी आता कडक पावले उचलली जाणार आहेत.
मालमत्ता कराप्रमाणेच पाणीपट्टी कराची वसुलीही २०१५-१६ या आर्थिक वर्षात ९५.९२ टक्के झाली आहे. पाणीपट्टीपोटी या आर्थिक वर्षात २ कोटी ७९ लाख ६९ हजार एवढी मागणी होती. प्रत्यक्षात २ कोटी ७९ लाख ६९ हजार एवढी वसुली झाली आहे. या वर्षात शहरातील २५ पाणीजोडण्या काही कारणांमुळे तोडण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी शहरातील एलईडी प्रकल्पाची उभारणी सुरू झाली आहे. त्यातील थिबापॅलेस रोडवरील एलईडीचे काम पूर्ण झाले असून, येत्या ८ एप्रिलला गुढीपाडव्यादिवशी या मार्गावरील एलईडी सुरू करण्यात येणार आहेत. याचदिवशी सायंकाळी क्रीडा स्पर्धाही होणार असल्याचे मयेकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मोहिमेतील कारवाई : थकबाकीदारांच्या १५ मालमत्ता सील
1नगर परिषदेने थकबाकीदारांच्या १५ मालमत्ता सील केल्या आहेत. त्यातील संचयनीकडे ७ लाख ६५ हजार ३५० रुपये, कल्पवृक्ष कंपनीकडे २ लाख १७ हजार तर पॅगोडा कंपनीकडे ८४,११२ रुपये थकबाकी आहे. गेल्या सात वर्षांपासून ही थकबाकी असल्याने या मालमत्ता लिलावाचा विचार सुरू आहे.
2मालमत्ता कराची सरकारी थकबाकी ३० लाख ९६ हजार रुपये आहे. यामध्ये बीएसएनएल टॉवर - ५ लाख ९१ हजार, टपाल खाते - १ लाख ५० हजार, जिल्हाधिकारी कार्यालय - ३ लाख ३० हजार व एस. टी. महामंडळाकडे २ लाख १९ हजार थकबाकी शिल्लक आहे.
चार हजार लाल कार्ड
रत्नागिरी नगर परिषदेची घरपट्टी व पाणीकर वसुली वेगात व्हावी, थकबाकी राहू नये, यासाठी मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ४ हजार मालमत्ताधारकांना लाल कार्ड बजावण्यात आले होते. त्याचा वसुलीसाठी चांगला उपयोग झाला आहे.