दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सह्याद्री धावला

By admin | Published: May 24, 2016 09:44 PM2016-05-24T21:44:42+5:302016-05-24T23:38:14+5:30

खेड तालुक्याच्या तळे गावातील ग्रामस्थांनी गावात चारा छावणी उभारून मराठवाडा विभागातील दुष्काळी भागात असणाऱ्या जनावरांसाठी १२० टन हिरवा चारा देण्याचा संकल्प केला.

Sahyadri ran to wipe the tears of drought-stricken farmers | दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सह्याद्री धावला

दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी सह्याद्री धावला

Next

आवाशी-(सुनील आंब्रे)  : दुष्काळाची दाहकता तीव्र होत असल्याने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना काहीतरी मदत करावी, या कल्पनेतून खेड तालुक्याच्या तळे गावातील ग्रामस्थांनी गावात चारा छावणी उभारून मराठवाडा विभागातील दुष्काळी भागात असणाऱ्या जनावरांसाठी १२० टन हिरवा चारा देण्याचा संकल्प केला. एवढेच नव्हे; तर त्याची पहिली गाडी २० टन चारा घेऊन लातूर येथील जळकोट येथे निघाली आहे.कोकणी माणूस दयाळू, हळवा, परोपकारी असल्याचे म्हटले जाते. हा माणूस दुसऱ्याचे दु:ख ते आपले समजून मदतीला धावताना कुचराई करत नाही. आजही त्याचा प्रत्यय येत आहे. खेड तालुक्यातील तळे हे गाव माणुसकीने व मनाने श्रीमंत आहे. येथील सर्व ग्रामस्थांनी मिळून दुष्काळग्रस्तांना आपण काही मदत करू शकतो का? यावर विचारविनिमय केला आणि गावातच हिरवा चारा निर्माण करून तो जनावरांना देऊया, ही संकल्पना उभी ठाकली. मग सरपंच दीपाली मोरे, ग्रामस्थ कुंदन मोरे, चंद्रकांत मोरे, काशिनाथ मोरे, बाळकृष्ण मोरे, भागोजी मोरे, हरिचंद्र मोरे व अन्य ग्रामस्थांनी याचा निश्चय करत १ मे रोजी याची मुहूर्तमेढ रोवली. याला पाठबळ मिळाले ते दापोलीचे उपविभागीय अधिकारी जयकृष्ण फड यांचे!याबाबत माहिती देताना ग्रामस्थांनी सांगितले की, मक्याचा चारा असे या प्रकल्पाचे नाव असून, दीड गुंठे जागेत हा प्रकल्प उभारला आहे. १ किलो मक्यापासून ७-८ किलो चारा केवळ सहा दिवसात तयार करता येतो. मका २४ तास भिजवून त्याला ४८ तासात मोड येतात. १ ट्रेयमध्ये १ किलो असे १० हजार ट्रेय बांबूची शेड उभी करून त्यावर ठेवण्यात आले आहेत.
दर २ तासांनी त्याला केवळ २ मिनिटे पाणी सोडण्यात येते. दिवसाला १ हजार किलो असे आठवड्याला ७ हजार किलो चारा तयार होतो. इतर कोणतीही प्रक्रिया वा खर्च यास लागत नाही. आम्ही दुष्काळग्रस्त मराठवाडा भागाला १२० टन चारा देणार असून यानंतर आम्ही आमच्या गावातीलच जनावरांसाठी याचा वापर करणार आहोत. याआधी शासनाने रेल्वेतून लातूरला पाणी पुरवले. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याने याच दुष्काळी भागातील जनावरांना आज हिरवा चारा पाठवून जिल्ह्यासह कोकणची मानही उंचावल्याचा प्रतिक्रिया जिल्हाभरातून उमटत आहेत.

Web Title: Sahyadri ran to wipe the tears of drought-stricken farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.