रत्नागिरी: साई रिसॉर्ट प्रकरण, माजी मंत्री अनिल परबांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 01:37 PM2022-11-08T13:37:50+5:302022-11-08T13:38:34+5:30
रिसॉर्ट पाडण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच अनिल परबांसह सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिवाजी गोरे
दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावरील वादग्रस्त साई रिसॉर्ट प्रकरणी दापोली पोलीस स्टेशनमध्ये माजी मंत्री अनिल परबांसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात तत्कालीन सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली. याकारवाई प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्टिट केले आहे. सोमय्या यांनी केलेल्या ट्टिटमध्ये एफआयआरची कॉपी पोस्ट केली आहे.
दापोली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रुपा दिघे यांनी फिर्याद दिल्याने अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता कलम ४२० अन्वये हा गुन्हा दाखल झाला. रात्री १२ वाजता बीडीओनी तक्रार दाखल केली असता गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अनिल परब यांनी खोटी कागदपत्रे, दर करून शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
सदर तत्कालीन मालमत्ता धारक अनिल परब यांनी इमारत पूर्ण नसतानाही इमारत पूर्ण असल्याचे भासवून ग्रामपंचायत मुरुड दापोली यांची पर्यायाने शासनाची फसवणूक केलेली आहे, तसेच मुरुड दापोली गावचे तत्कालीन सरपंच, ग्रामसेवक यांनी मुरुड दापोली गट क्रमांक ४४६ मधील इमारत क्रमांक १०७४ ची ग्रामपंचायत नमुना क्रमांक ८ अभिलेख नोंद घेताना समक्ष जागेवर जाऊन इमारतीच्या पूर्णत्वाची खात्री न करता नोंद करून आकारणी केल्याचे दिसून येत असल्याचे गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांचे साई रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे सांगत हे प्रकरणी लावून धरले होते. दुसरीकडे अनिल परबांनी सोमय्यांचे आरोप फेटाळून लावत या रिसॉर्टशी आपला काही संबंध नसल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते.
दरम्यान, राज्यात सत्तात्तंर होताच सरकारने हे रिसॉर्ट पाडकामाचे आदेश दिले. बांधकाम पाडण्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या. त्यासाठी लागणारा एक कोटी रुपयांचा निधी शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गही करण्यात आला आहे. त्यामुळे रिसॉर्ट पाडण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच अनिल परबांसह सरपंच, ग्रामसेवकावर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
#Dapoli Resorts Farud. FIR registered against #AnilParab & others under IPC 420
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 8, 2022
दापोली रिसॉर्ट्स घोटाळा. अनिल परब आणि इतरांविरुद्ध आयपीसी 420 अंतर्गत एफआयआर गुन्हा दाखल @mieknathshinde@Dev_Fadnavis@BJP4Indiapic.twitter.com/dIBjoOXYFy