पगार थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:34 AM2021-04-28T04:34:41+5:302021-04-28T04:34:41+5:30
देवरूख : कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स, कर्मचारी अजूनही वेतनाविना आहेत. बारा बारा तास काम करणाऱ्या ...
देवरूख : कोरोना काळात दिवसरात्र काम करणाऱ्या आरोग्य यंत्रणेतील डाॅक्टर्स, कर्मचारी अजूनही वेतनाविना आहेत. बारा बारा तास काम करणाऱ्या या कोरोना योद्ध्यांनाच आता पगाराविना राहण्याची वेळ आहे. सध्या सर्वच बाबतीत मंदी असतानाच या कोविड योद्ध्यांना वेतनाविना रहावे लागत आहे.
रामफळ डागाळले
देवरूख : कोकणात बदलत्या वातावरणाचा फटका आंबा, काजू, फणस आदी फळांना मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्याचबरोबर आता या वातावरणाचा फटका रामफळासारख्या आणखी एका मधूर फळाला बसला आहे. उष्म्यामुळे तसेच मळभामुळे हे फळ डागाळत आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
खेड : शासनाचे घोषवाक्य झाडे लावा, झाडे जगवा असे असले तरी सध्या अधिक झाडे तोडण्याकडेच सर्वांचा कल दिसत आहे. खेड तालुक्यात सध्या अवैध वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. बेकायदा झाडे तोडून परजिल्ह्यात या झाडांची वाहतूक केली जात आहे. वन विभागाने कारवाई करण्याची मागणी होत आहे.
अन्य उपचारांवर परिणाम
मंडणगड : कोरोनाचा संसर्ग वाढल्यापासून इतर आजारांवर उपचार मिळतानाही रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या भीतीमुळे खासगी डाॅक्टरही रुग्णांवर उपचार करण्यासाठी घाबरत आहेत. त्यामुळे या रुग्णांना उपचारासाठी अन्य ठिकाणी हलविण्याची वेळ येते.
उद्यानातील खेळण्याची दुर्दशा
दापोली : कोरोनाचे संकट पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या मुले घरात असल्याने बगीचे, उद्यानांमध्येही शुकशुकाट आहे. उद्यानांकडे पाठ फिरल्याने यातील खेळण्यांची दुर्दशा झाली आहे.
मोकाट जनावरांचा वावर
रत्नागिरी : शहरातील सन्मित्र नगर येथे रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे आणि मोकाट श्वान यांचा उपद्रव वाढला आहे. रात्री ९ वाजल्यानंतर सध्या लाॅकडाऊन सुरू असल्याने सर्वत्र सामसूम असते. अशावेळी ही मोकाट जनावरे भररस्त्यातून चालत असतात. त्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्यांना त्रासदायक होत आहे.
घशाला कोरड कायम
मंडणगड : सध्या उन्हाळा वाढला आहे; मात्र सध्या लाॅकडाऊन असल्याने सर्व शीतपेयांचीही दुकाने बंद आहेत. रस्त्यालगत असलेल्या फिरत्या रस विक्रेत्यांची दुकानेही बंद असल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या घशाला तहानेने कोरड पडत आहे. उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे.
कार्यालयांसमोर शुकशुकाट
राजापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने आता शासकीय कार्यालयांमध्ये बाहेरून येणाऱ्या नागरिकांना बंदी केली आहे. सध्या केवळ ऑनलाइन कामेच सुरू असल्याने नागरिकांची अनेक कामे प्रलंबित रहात आहेत. नागरिकांची पाठ फिरल्याने या कार्यालयांसमाेर शुकशुकाट पसरलेला दिसून येतो.
उपस्थिती रोडावली
रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने लाॅकडाऊनच्या काळात शासकीय तसेच खासगी कार्यालये, आस्थापनांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य केली आहे. त्यामुळे सध्या प्रत्येक कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची अत्यल्प उपस्थिती आहे. त्यामुळे कार्यालयांमध्ये अनेक खुर्च्या - टेबले रिकामी दिसत आहेत.