‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेंतर्गत ४० हजार बॉक्स आंब्याची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:32 AM2021-05-10T04:32:03+5:302021-05-10T04:32:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ पणन महामंडळाकडून विक्री साखळी तयार करण्यात आली आहे. ...

Sale of 40,000 boxes of mangoes under 'Farmer to Direct Consumer' scheme | ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेंतर्गत ४० हजार बॉक्स आंब्याची विक्री

‘शेतकरी ते थेट ग्राहक’ योजनेंतर्गत ४० हजार बॉक्स आंब्याची विक्री

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : ‘शेतकरी ते थेट ग्राहक’ पणन महामंडळाकडून विक्री साखळी तयार करण्यात आली आहे. खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी करण्यात येत असून पणन महामंडळाच्या या विक्री व्यवस्थेला सलग दुसऱ्या वर्षीही चांगला प्रतिसाद लाभत आहे. ऑनलाइनद्वारे हापूसचे ४० हजार बॉक्स थेट ग्राहकांना विक्री करण्यात आले आहेत. कोरोना संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा प्राप्त झाला आहे.

शेतकरी ग्राहकाला शेतमाल विक्री करू शकता येईल यासाठी थेट विक्री योजना महामंडळातर्फे राबविण्यात येत आहे. त्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर बागायतदार आणि खरेदीदार यांनी नोंदणी करावयाची आहे. यामध्ये मागणी किमान शंभर बॉक्सची अट ठेवण्यात आली होती. या पोर्टलवर रत्नागिरी जिल्ह्यातील ३५० बागायतदारांनी थेट विक्रीसाठी नावे नोंदवली होती. यामधून दोन डझनच्या २५ बॉक्सपासून ते हजार बॉक्सपर्यंतची मागणी खरेदीदारांनी केली होती. त्यानुसार बागायतदारांनी वाहतूकदारांच्या माध्यमातून तर काहींनी थेट स्वत:च्या गाडीने ग्राहकांपर्यंत हापूसचे बॉक्स पोहोचविण्यात आले. मुंबई, पुणे, सोलापूर, बारामती, अकोल्यापर्यंत हापूस विक्रीसाठी पाठविण्यात आला.

कोरोनामुळे गतवर्षी वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती. मात्र कृषी आणि पणन विभागाकडून बागायतदारांना हा दिलासादायक मार्ग दाखविण्यात आला. थेट विक्रीमुळे दर्जेदार हापूसला चांगला दर प्राप्त होत असून विक्रीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात जमा होत आहेत. ग्राहकांनी मागणी नोंदवली की तातडीने पैसेही जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांची रक्कम बुडण्याचा प्रश्न राहत नाही. या पद्धतीमुळे गतवर्षी ८० हजार बॉक्सची विक्री झालेली होती. यावर्षी एकूणच आंबा उत्पादन कमी आहे. शिवाय वाशी फळ बाजारात हापूसचे दर गडगडल्यामुळेच थेट विक्रीसाठी चांगला प्रतिसाद लाभत आहे.

कोट घ्यावा

पणनच्या संकेतस्थळावर ग्राहक किंवा शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. या माध्यमातून खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आंब्याचा दर, दर्जाची माहिती ग्राहकाला प्राप्त होत आहे. शिवाय शेतकरीही ग्राहकांच्या मागणीनुसार आंबा उपलब्ध करून देत आहे. गतवर्षीच्या तुलनेत निम्मा आंबा पाठविण्यात आला असला तरी यावर्षी एकूणच उत्पादन कमी आहे. अद्याप ग्राहकांकडची मागणी वाढत असल्याने वाढ होण्याची शक्यता आहे.

- भास्कर पाटील, सरव्यवस्थापक, पणन

Web Title: Sale of 40,000 boxes of mangoes under 'Farmer to Direct Consumer' scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.