चिपळुणात ८०० टन खताची विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:23 AM2021-06-06T04:23:45+5:302021-06-06T04:23:45+5:30
चिपळूण : गेल्या दोन महिन्यात तालुका खरेदी-विक्री संघातून ८०० टन खताची विक्री झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अशोक कदम यांनी ...
चिपळूण : गेल्या दोन महिन्यात तालुका खरेदी-विक्री संघातून ८०० टन खताची विक्री झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष अशोक कदम यांनी दिली. खताचे दर कमी झाल्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा हाेत आहे.
गेल्यावर्षीपासून सर्वत्र कोरोनाचे संकट आले आहे. या कालावधीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून, रोजगारही बुडाला आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या कुटुंबाच्या शेतीकामाला हातभार लावण्यास सुरूवात केली आहे. त्यातून शेती लागवडीचा टक्का काही अंशी वधारला आहे. त्यामुळे चिपळूण खरेदी-विक्री संघ शेतकऱ्यांना आवश्यक त्या सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे. येथे उपलब्ध करण्यात आलेल्या भात - बियाण्याची मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आहे, तर खतांची खरेदीही सुरू आहे.
यावर्षी शासनाने विविध कंपन्यांच्या खतांच्या किमतीत ४० रूपयांपासून अगदी ७०० रूपयांपर्यंत कपात केली आहे. त्याचा फायदा आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना होत आहे. येथील खरेदी-विक्री संघातून आतापर्यंत ८०० टन खताची विक्री झाली आहे. त्यात युरिया, कृषी १८:१८:१०, समर्थ, संपूर्णा, डी. ए. पी., एनपीएस, एस. एस. पी. पावडर, एस. एस. पी. या खतांचा समावेश आहे. दरवर्षी तालुक्यासाठी हंगामात २ हजार ५०० टन खत लागत असून, ते टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जात असल्याचे कदम यांनी सांगितले.