रत्नागिरीत पाेलिस बंदाेबस्तात पेट्राेलची विक्री
By शोभना कांबळे | Published: January 2, 2024 11:21 AM2024-01-02T11:21:53+5:302024-01-02T11:24:21+5:30
रत्नागिरी : वाहन अपघात झाल्यास शहानिशा न करता त्या चालकाला दोषी धरून दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या ...
रत्नागिरी : वाहन अपघात झाल्यास शहानिशा न करता त्या चालकाला दोषी धरून दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या दंडाची तरतूर करणारा नवीन कायदा संसदेत येऊ घातला आहे. या कायद्याच्या निषेधार्थ सोमवारपासून सर्व वाहन चालकांनी संप पुकारला. या संपात टँकर चालक सहभागी झाल्याने रत्नागिरीत मिरजेहून येणारे टँकर अडकल्याने पेट्राेलची टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे रत्नागिरी शहरातील पेट्राेल पंपावर वाहनचालकांनी सकाळपासूनच गर्दी केली आहे. पेट्राेल पंपावर काेणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सकाळपासूनच पाेलिसांचा बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे (फामपेडा) चे पदाधिकारी उदय लोध यांनी सांगितले की, अपघात झाल्यानंतर त्या चालकाला जामीनही न देता त्याना दहा वर्षे शिक्षा किंवा ५० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा करण्यात होणार आहे. हा कायदा संसदेत प्रस्तावित आहे. हा कायदा संमत झाल्यास संबंधित चालकाचा दोष आहे किंवा नाही, हे न पाहता त्याला अजामीनपात्र शिक्षेकरिता पात्र ठरविले जाणार आहे. त्यामुळे या कायद्याविरोधात देशभरात निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व वाहन चालकांनी सोमवारपासून संपाला सुरुवात केली.
रत्नागिरीत मिरज येथील तीन डेपोतून पेट्रोलचा पुरवठा केला जातो. रत्नागिरीत येणाऱ्या गाड्यांसाठी पैसे देण्यात आले आहेत. मात्र, वाहन चालकांच्या संपामुळे या गाड्या मिरज येथील डेपोसमोरच उभ्या आहेत. अद्याप या गाड्या भरलेल्या नसल्याने सोमवारी या गाड्या रत्नागिरीत आलेल्या नाहीत. त्यामुळे पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा तुटवडा निर्माण झाला.
संपाची माहिती नागरिकांमध्ये पसरताच इंधनाच्या तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी रत्नागिरी शहरातील पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली. मात्र, पेट्रोल पंप चालकांनी पेट्रोल संपल्याचे जाहीर केले. त्यामुळे वाहन चालक प्रत्येक पेट्रोल पंपावर उशिरापर्यंत शोधाशोध करत हाेते. त्यामुळे शहरातील पेट्रोल पंपांसमोर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. तर मंगळवारी सकाळपासूनच शहरातील पेट्राेल पंपावर वाहनचालकांनी गर्दी केली हाेती. त्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या हाेत्या.
पेट्राेल पंपावर काेणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये याची खबरदारी पाेलिस प्रशासनाने घेतली आहे. पेट्राेल पंपाबाहेर पाेलिस तैनात करण्यात आले असून, पेट्राेल पंपांना पाेलिसांची सुरक्षा पुरविण्यात आली आहे. सकाळपासून पेट्राेलपंपाबाहेर पाेलिसांचा खडा पहारा हाेता.