सलून दुकानदारांचा आत्मदहनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:28 AM2021-04-14T04:28:29+5:302021-04-14T04:28:29+5:30
मंडणगड : दोन दिवसांच्या बंदनंतर शहराची खुली झालेली बाजारपेठे प्रशासनाने बंद केल्याने समस्याग्रस्त व्यापारी व दुकानदार आक्रमक झाले व ...
मंडणगड : दोन दिवसांच्या बंदनंतर शहराची खुली झालेली बाजारपेठे प्रशासनाने बंद केल्याने समस्याग्रस्त व्यापारी व दुकानदार आक्रमक झाले व लॉकडाऊनविरोधात तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले.
यासंदर्भात शहर व्यापारी संघटनेच्या निवेदनातील माहितीनुसार शहरातील बाजारपेठ ही छोटी असून यातील उलाढाल कमी प्रमाणात आहे. बाजारपेठेत सर्व प्रकारची मिळून १५० व्यापारी दुकानांपैकी शंभरहून अधिक व्यापारी हे जीवनावश्यक विक्री या श्रेणीतील आहेत. जिल्हाधिकारी यांच्या नियमानुसार या आस्थापना चालू राहणार आहेत. त्यातील अनेक व्यापारी शासनांच्या चुकीच्या नियमांनी बाधित होत आहेत. सर्व शासकीय निमशासकीय कार्यालये, बँका, पतसंस्था, बाजार समित्या चालू राहणार आहेत. पण येथे येणारे ग्राहक व पक्षकारांसाठी आवश्यक झेरॉक्स दुकाने व फोटोग्राफर बंद राहणार आहेत.
गेले एक वर्ष लॉकडावूनमध्ये सर्व व्यापारी व छोटे दुकानदार होरपळले असून, नवीन नियमावलीनुसार त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. घरखर्च, बँकेची कर्ज, वीज बिल, दुकानभाडे, कामगारांचे पगार यामुळे व्यापारी वर्गासमोर आर्थिक संकट ओढवलेले आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे मोठे नुकसान सोसावे लागले आहे. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत असताना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय हा स्थानिक व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा असून, मंडणगड तालुक्याचे दुर्गम परिस्थितीचा विचार करून नियमावलीत वेळीच बंधन टाकून आम्हाला व्यवसाय करण्यासाठी शिथिलता मिळावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर शहरातील व्यापारी वैभव कोकाटे, दीपक घोसाळकर, दिनेश साखरे यांच्यासह २९ व्यापाऱ्यांच्या सह्या आहेत.
आत्मदहनाचा इशारा
श्री संतसेना महाराज नाभिक समाज उत्कर्ष मंडळ तालुका मंडणगड यांच्यावतीने तहसील कार्यालयात सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहितीनुसार, राज्य शासनाने ३० एप्रिल २०२१ पर्यंत सलून व ब्युटीपार्लर बंद करण्याचे आदेश दिले आहेत. याचा जाहीर निषेध करताना राज्य शासनाने सलून व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची मदत दिली नाही. यामुळे २० समाजबांधवांनी राज्यात आत्महत्या केली आहे. याची साधी दखलही सरकारकडून घेण्यात आलेली नाही. अशा पद्धतीचे नियम करून आम्हाला जर जेरंबद करायचे असेल तर प्रथम शासनाने २५ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रत्येक सलून चालकाच्या खात्यात जमा करावी. जबरदस्ती करून दुकाने बंद केली तर आम्ही सर्व नाभिक समाजबांधव व तालुक्यातील सलून व्यावसायिक आत्मदहन करू इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यावर अध्यक्ष प्रवीण जाधव यांची सही आहे.