नऊ महिन्यांच्या गरोदर परिचारिकेच्या कार्याला सलाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:42 AM2021-06-16T04:42:26+5:302021-06-16T04:42:26+5:30
खेड : नऊ महिन्यांची गर्भवती असूनही, हक्काची सुटी न घेता कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले ...
खेड : नऊ महिन्यांची गर्भवती असूनही, हक्काची सुटी न घेता कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका अस्मिता प्रशांत मोरे यांच्या कार्याचा गौरव दापोली मतदारसंघाचे आ. योगेश कदम यांनी नुकताच केला.
गर्भवती महिलेला खरे तर आराम करण्याची नितांत गरज असते. किंबहुना डॉक्टरही अशा महिलांना स्वतःची काळजी घेण्यासाठी आराम करण्याचा सल्ला देतात. त्यासाठी भरपगारी रजाही मिळते. मात्र, स्वत:च्या आरामापेक्षा कर्तव्याला महत्त्व देत अस्मिता मोरे यांनी आपली शासकीय सेवा सुरू ठेवली.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा आहे, तेच माझे आद्य कर्तव्य आहे, या कामात मला आनंद व मानसिक समाधान मिळते, असे मत अस्मिता मोरे यांनी व्यक्त केले. आरोग्य विभागात अपुरा कर्मचारी वर्ग आणि समोर कोरोनाचे मोठे संकट अशा वेळी आपण बाळंतपणाची रजा घेऊन घरी बसलो तर त्याच्यासारखे दुसरे पाप नाही. हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही. आरोग्य सेविकेचे काम हे चांगले काम असून रुग्ण बरा झाल्यावर त्याच्या व त्याच्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावरील समाधान मनाला अधिक जोमाने काम करण्याची उभारी देते, असे मत असलेल्या तळे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका अस्मिता मोरे यांच्या अविस्मरणीय कार्यसेवेचा आ. योगेश कदम यांनी गौरव केला.
आरोग्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कशा प्रकारे सेवा करावी, याचे आपण मूर्तिमंत उदाहरण आहात, असे गौरवोद्गार काढून सेवाभावी कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती मानसी जगदाळे, उपसभापती जीवन आंब्रे, माजी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख विजय जाधव, विजय कदम, अपर्णा नक्षे, सरपंच दिनेश चव्हाण, सचिन धाडवे, महेंद्र भोसले, नरेंद्र गावडे, गोपीनाथ मोरे, श्रीकांत शिर्के, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजन शेळके आदी उपस्थित होते.