कोकणचा 'समर्थ' युपीएससी परिक्षेत २५५ रँकवर चमकला, पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश
By संदीप बांद्रे | Published: April 17, 2024 03:57 PM2024-04-17T15:57:17+5:302024-04-17T15:59:39+5:30
लहाणपणीच सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न पाहणाऱ्या समर्थने प्रचंड मेहनत घेत पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण होण्यात यश मिळवले
चिपळूण : येथील बालपणापासूनच नेतृत्व आणि वकृत्वाचे गुण ठासून भरलेल्या समर्थ अविनाश शिंदे यांनी केद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी) परिक्षेत झेंडा फडकवला आहे. युपीएससी परिक्षेत देशपातळीवर २५५ वी रॅक मिळवून तालुक्यातील दसपटी विभागात मानाचा तुरा रोवला. लहाणपणीच सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न पाहणाऱ्या समर्थने प्रचंड मेहनत घेत पहिल्याच प्रयत्नात युपीएससी उत्तीर्ण होण्यात यश मिळवले.
मुळचे कळकवणे व सध्या खेर्डी सती येथे वास्तव्यास असलेले उद्योजक अविनाश शिंदे यांचा समर्थ हा मुलगा. आई नेहा शिंदे या शिक्षीका आहेत. समर्थचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण खेर्डी येथील मेरी माता इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झाले. शालेय शिक्षण सुरू असतानाच मुख्याध्यापकांनी सनदी अधिकारी होण्याचे गूण असल्याचे समर्थला सांगितले होते. पुढे बारावीपर्यतचे शिक्षण मॉडर्न कॉलेज पूणे येथे झाले. त्यानंतर रत्नागिरी येथील फिनोलेक्स महाविद्यालयात त्याने मेकॅनिकल इंजिनीरींगचे शिक्षण घेतले. इंजिनीरींगचे शिक्षण झाल्यानंतर स्पर्धा परिक्षेच्या अभ्यासाकरिता पुण्यात गेला आणि केवळ सव्वा वर्षाच्या कालावधीत युपीएससी परिक्षेत यश मिळवण्याचा मान पटकावला.
समर्थमध्ये लहाणपणापासून नेतृत्व आणि वकृत्वाचे गुण ठासून भरलेले होते. वडील इंजिनीअर तसेच एमबीए आणि आई प्रख्यात शिक्षीका असल्याने समर्थला लहाणपणापासन चांगले मार्गदर्शन मिळत गेले. त्याने अवांतर वाचनावर भर दिला. पुण्यात बारावीचे शिक्षण घेताना जेईईची केलेली तयारी देखील त्याला फायदेशीर ठरली.
युपीएससीचा अभ्यास सुरू असतानाच त्याचे एअरफोर्स मध्ये पहिल्या पाच मध्ये निवड झाली होती. एअरफोर्सची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास शिकवतानाच त्याने ही कामगिरी केली. परंतू सनदी अधिकाऱ्याचे स्वप्न उराशी बाळगलेल्या समर्थने एअरफोर्समध्ये न जाणे पसंत केले. आयएएससाठी त्यांने परिश्रम सुरूच ठेवले. परिणामी त्याने बाळगलेली जिद्ध, चिकाटी आणि चौकस विचारशैलीमुळे पहिल्याच प्रयत्नात युपीएससी परिक्षत २५५ रॅकने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला.