विघ्ने तीच, उत्साहही तोच!
By Admin | Published: September 9, 2016 11:39 PM2016-09-09T23:39:50+5:302016-09-10T00:40:26+5:30
-- कोकण किनारा
गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या माणसांसमोरची विघ्ने यंदाही कमी झाली नाहीत. महामार्ग खड्ड्यांनी भरलेलाच आहे. जादा रेल्वे, जादा एस्. टी. बसेस सोडूनही गर्दी, चेंगराचेंगरी तशीच आहे. धान्य, भाजीपाला महागलेलाच आहे. पण तरीही लोकांच्या उत्साहात कमी नाही. बाप्पांच्या आगमनाचा, पुजेचा आनंद तेवढाच आहे. बऱ्याच दिवसांनी नातेवाईकांना भेटायला मिळण्याचा आनंद तोच आहे. यंदा त्यातल्या त्यात जमेची बाजू एवढीच की ऐन गणेशोत्सवात कुठे मुसळधार पाऊस पडला नाहीये. त्यामुळे बाजारपेठा गर्दीने फुलून गेल्या आहेत आणि मुंबैकरांच्या आनंदाला उधाण आलं आहे.
गणेशोत्सव दरवर्षीच येतो. कामानिमित्त आपलं मूळ घर, मूळ गाव सोडून बाहेर गेलेली माणसं एका अनामिक ओढीने गावाकडे येतात. आरास सजते. मंडपीच्या झाडोऱ्याची टवटवी यजमानांच्या चेहऱ्यावर झळकते. दोन, चार, पाच दिवस रजा काढून आलेले मुंबईकर वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा या दिवसात साठवून घेतात आणि पुन्हा मार्गस्थ होतात धकाधकीच्या आयुष्याकडे.
काय असतं नेमकं या दिवसात? वर्षानुवर्षे रजा घेऊन गणपतीला गावी येणाऱ्या या मुंबईकरांच्या मनात नेमकं असतं तरी काय? काय करतात ते गावाला येऊन? एरवी असतं तसंच गाव याही दिवसात असतं ना? पण या दिवसांचं खास वैशिष्ट्य काय? एरवी जनरलच्या डब्यातून झोपून प्रवास करता येतो. पण मग रिझर्व्हेशनच्या डब्यातही प्रचंड गर्दी उसळते अशा प्रवासाची एनर्जी कुठून मिळत असेल? लोंबकळत का होईना, पण गावाला वेळेत पोहोचायचंच असतं.
या साऱ्या धडपडीमागे एक श्रद्धा आहे. बाप्पा हा मुळात साऱ्यांचा आवडता देव. त्यामुळे त्याची प्रतिष्ठापना करण्यातला आनंद वेगळा. कामानिमित्त गाव आणि मूळ घर सोडायला लागलं, ही खंत काहीशी भरून निघते ती याच दिवसात. पोटाची खळगी भरण्यासाठी घरातली तरूण मंडळी मुंबई-पुण्याकडे गेली, घरात फक्त म्हातारा-म्हातारी आणि असालाच तर घर-शेती बघणारा एक भाऊ आणि त्याचं कुटुंब... कोकणातल्या असंख्य ग्रामीण भागांमधलं हे चित्र. एरवी कसलीच जाग नसलेल्या या घरांना मुंबईकरांच्या येण्याने चैतन्य येतं. म्हातारा-म्हातारीच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांच्या जागी समाधानाच्या रेषा उमटतात. कुणा एका घरात आलेले पाहुणे वाडीतल्या प्रत्येक घराला कळतात. मग चार दिवस फक्त आपलेपणाचाच शिडकावा होत राहतो, विचारपूस होते. आरत्या, भजनांच्या निमित्ताने पुन्हा-पुन्हा भेटी होत राहतात.
गणपतीची आरास तयार करण्यापासून विसर्जनाच्या क्षणापर्यंत कोकणातली घरं आनंदानं खिदळत असतात. मुळात गावात पाऊल ठेवल्या ठेवल्याच येताना लोंबकळत केलेल्या प्रवासाचा ताण संपून जातो. घराच्या वाटेवर भेटणारी गावातली चार माणसं ‘अरे तू अमक्याचा ना रे... अरे तू तमक्याचा ना रे....’ अशी चौकशी करतात आणि त्याचवेळी मुंबईकर पुन्हा गाववाला होऊन जातो. परतीच्या प्रवासातही लोंबकळणं चुकत नाही. तीन महिन्यांपूर्वी रिझर्व्हेशन केलेले असते तरी रिझर्व्हेशनच्या डब्यातही भरपूरच गर्दी असते. पण मिळालेली एनर्जी इतकी भरपूर असते की या लोंबकळण्याचाही त्रास होत नाही.
काळ कितीही बदलत गेला तरी गणेशोत्सवाचा आनंद कमी झालेला नाही. उलट दिवसागणिक तो वाढतोच आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात हेच चित्र दिसतं. मे महिन्यानंतर काहीशा मंदीत चालणाऱ्या या दोन्ही जिल्ह्यातील बाजारपेठा गणेशोत्सवात भरभरून वाहतात. खूप मोठी आर्थिक उलाढाल या काळात दोन्ही जिल्ह्यात होते. काही लाख माणसे या दोन जिल्ह्यांमध्ये येतात. गणपतीची आरास तयार करण्याचे साहित्य, मिठाई, कपडे यासारख्या खरेदीबरोबरच घरांची डागडुजी, रंगरंगोटी यासारख्या गोष्टींवरही मोठ्या प्रमाणात खर्च होतो. आर्थिक दृष्ट्या विचार केला तर दोन्ही जिल्ह्यात कोट्यवधी रूपयांची उलाढाल होते. अगदी फुल विक्रेत्यांपासून टी.व्ही., फ्रीज विकणाऱ्यांपर्यंत सर्वच दुकानांमध्ये गर्दी लोटते. यंदाही तेच चित्र दिसतंय. महाडमधल्या दुर्घटनेमुळे यंदा मुंबईकरांची संख्या थोडी कमी होईल की काय, अशी भीती होती. पण कितीही विघ्नं आली तरी कोकणी माणसाचं गणेशोत्सवावरचं प्रेम कायम आहे, हेच यातून दिसून आलं. शिमगा आणि गणपती सणादरम्यान कितीही विघ्नं आली तरी कोकण असाच फुललेला दिसेल, हे नक्की.
मनोज मुळ््ये