Ratnagiri: आजीच्या प्रेरणेने राजापुरातील समृद्धी बनली न्यायाधीश, तीन वर्षे सोशल मीडियापासून होती दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 18:56 IST2025-04-02T18:56:13+5:302025-04-02T18:56:49+5:30
राजापूर : कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज साध्य करता येते, हे राजापुरातील ...

Ratnagiri: आजीच्या प्रेरणेने राजापुरातील समृद्धी बनली न्यायाधीश, तीन वर्षे सोशल मीडियापासून होती दूर
राजापूर : कष्ट करण्याची तयारी आणि मनात जिद्द असेल तर अशक्य वाटणारी गोष्टही सहज साध्य करता येते, हे राजापुरातील समृद्धी प्रशांत नार्वेकर हिने दाखवून दिले आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीला कठोर परिश्रमाची जोड देत आजीकडून प्रेरणा घेऊन तिने पहिली महिला न्यायाधीश बनण्याचा मान मिळविला आहे.
तिने बारावीनंतर कोल्हापूर येथे वकिलीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पुढे दोन वर्षात दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षेत यश मिळविले. राजापूर तालुक्यात अशा प्रकारे न्यायाधीश होणारी ती पहिली न्यायाधीश ठरली आहे.
या परीक्षेसाठी बसलेल्या ११४ विद्यार्थ्यांमध्ये समृद्धीने राज्यात तिसावा आणि मुलाखतीत ५०पैकी ३५ गुण मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. राजापुरातील सुवर्णकार प्रशांत व प्रेरणा नार्वेकर यांची ती सुकन्या आहे. परीक्षा कालावधीत तिने राजापुरातील विधिज्ञ ॲड. मिलिंद चव्हाण यांच्याकडे क्रिमिनल केससाठी सरावही केला हाेता.
आजी सेवानिवृत्त न्यायाधीश
समृद्धी हिची आजी म्हणजे आईची आई श्रद्धा रांगणेकर या न्यायाधीश होत्या. त्या जिल्हा न्यायाधीश पदावरून सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेत आपण याच क्षेत्रात करिअर करायचे, असे समृद्धीने निश्चित केले होते. आपल्या या यशात आजी श्रद्धा रांगणेकर, प्रगती नार्वेकर, वडील प्रशांत, आई प्रेरणा, भाऊ सामर्थ्य यांच्यासह गुरूजनांचा मोठा वाटा असल्याचे ती म्हणाली.
तीन वर्षे सोशल मीडियापासून दूर
प्रारंभापासूनच न्यायाधीश बनण्याचे ध्येय आपल्याला गाठायचे आहे हे ठरविले होते. त्यासाठी मनापासून कठोर परिश्रम घेण्याचीही तयारी ठेवली होती. लॉच्या शेवटच्या वर्षात असताना व या परीक्षेची तयारी करत असताना तीन वर्षे पूर्णपणे मी माझा मोबाइल बंद ठेवला होता. केवळ आई-वडिलांना दिवसातून एकदा फोन कॉल करण्यासाठी सुरू करायचा. त्यानंतर बंद करायचा, असे तिने सांगितले. तीन वर्ष मी पूर्णपणे साेशल मीडियापासून दूर हाेते, असेही ती म्हणाली.