जिल्ह्यातील चार खाड्यांमधील हातपाठी उत्खननासाठी मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2020 10:20 AM2020-10-29T10:20:15+5:302020-10-29T10:22:52+5:30
sand, ratnagiri, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने रत्नागिरी जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी दिली.
रत्नागिरी : महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने जिल्ह्यातील चार खाड्यांचे सर्व्हेक्षण करून ६,२९,३५७ ब्रास वाळू काढण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे या वाळूच्या उत्खननासाठी परवाने देण्याकरिता दर निश्चित करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी दिग्विजय पाटील यांनी दिली.
कोकणात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस असतो. त्यामुळे खनिकर्म विभागाचे ऑक्टोबर र ते सप्टेंबर असे आर्थिक वर्ष ग्राह्य धरले जाते. पुर्वी वाळू उत्खननासाठी खनिकर्म विभागाकडून परवानगी दिली जात असे. मात्र, आता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला हे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार मेरीटाईम बोर्ड खाड्यांचे सर्वेक्षण करून वाळू उत्खननाची जागा निश्चित करून परवानगी देते.
यानुसार आता जिल्ह्यातील आंजर्ला खाडीतील ३ गट आणि दाभोळ, जयगड आणि काळबादेवी या तीन खाड्यांमधील प्रत्येकी एक अशा एकूण सहा गटातील ६,२९,३५७ ब्रास वाळूसाठी मेरीटाईम बोर्डाकडून परवानगी देण्यात आली आहे. या वाळूच्या उत्खननासाठी आता दर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. शासनाकडून दर निश्चिती झाल्यानंतर वाळू उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. ड्रेजरने वाळू उपसा करण्यासाठीही मेरी टाईम बोर्डाकडून सर्वेक्षण झाल्यानंतर वाळू उत्खननासाठी ना हरकत परवाने देण्यात येणार आहेत.
गेल्यावर्षी लिलावातील दर अधिक प्रमाणावर असल्याने सातत्याने लिलाव करूनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे वाळूचा लिलाव होऊ शकले नाहीत. सध्या बांधकाम क्षेत्राला आलेली गती लक्षात घेता वाळूचा तुटवडा अधिक जाणवू लागला आहे. त्यामुळे वाळू उत्खननानंतर त्याच्या लिलावाची प्रतीक्षा करण्यात येत आहे.
जिल्हा खनिकर्म विभागाकडून हातपाटी वाळू उत्खननासाठी शासनाकडे दर निश्चितीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असून त्यानंतर उत्खननासाठी परवाने देण्यात येणार आहेत. त्यामुळे आता वाळू व्यावसायिकांचे शासनाच्या मंजुरीकडे लक्ष लागले आहे.
खाडी वाळू (ब्रास)
- आंजर्ले खाडी (३ गट) २,५०,३९८
- दाभोळ (१ गट) १,९२,८७७
- जयगड (१ गट) ४०,०५८
- काळबादेवी (१ गट) १,४६,०२४
एकूण (६ गट) ६,२९,३५७