चिपळुणात ‘काळ्या सोन्या’चा काळा बाजार, अवघ्या आठ मिनिटात पाचशे ब्रास वाळूची उलाढाल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 12:21 PM2023-12-30T12:21:58+5:302023-12-30T12:22:23+5:30
ऑनलाइनच्या गुंतागुतीतून एजंटगिरीला पेव
चिपळूण : वाळूसाठी सरकारने सुरू केलेली ऑनलाइन प्रक्रिया गुंतागुंतीची असल्याने दर स्वस्त हाेऊनही सर्वसामान्य नागरिकांना वाळू मिळणे कठीण बनले आहे. कधी संकेतस्थळ उघडत नाही, तर कधी टोकन नंबर मिळत नाही. या प्रक्रियेत एजंटचे जाळे वाढले असून, त्यांच्यातच टोकन नंबर मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातून वाळूचा काळा बाजार जाेरात सुरू असून, अवघ्या आठ मिनिटात पाचशे ब्रास वाळूची उलाढाल हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त हाेत आहे.
चिपळुणात तीन वाळू डेपोला मान्यता मिळाली आहे. त्यातील गोवळकोट धक्का मैदान येथे दोन, तर करंबवणे येथे एक अशा तीन डेपोपैकी गोवळकोटचे दोन डेपो सुरू झाले आहेत. या वाळू खरेदीसाठी प्रति ब्रास ६०० व ५ टक्के जीएसटी इतकी रक्कम भरून ऑनलाइन बुकिंग घेतले जात आहे. या नव्या डेपोच्या माध्यमातून शासनमान्य मंजूर घरकुलांना दहा ब्रास मोफत वाळू मिळणार आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकांना ६५० रुपयांची वाळू मिळणेही कठीण झाले आहे. सुरुवातीचे काही दिवस ऑनलाइन पद्धतीने सरसरकट वाळू मिळत होती.
मात्र, आता संकेतस्थळ वेळेवर सुरू होत नाही, आयडी मिळत नाही, गाडीचा वजनकाटा बंद पडला आहे, संकेतस्थळ सुरू झाले तर आठ मिनिटात वाळू संपते आणि पुन्हा संकेतस्थळ कधी सुरू होईल हेही सांगता येत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे वाळूची गरज असलेल्या नागरिकांना डेपोच्या ठिकाणी वारंवार खेटे मारावे लागत आहेत. ऑनलाइन स्वरूपात आयडी मिळवल्यानंतर १० दिवस पाठपुरावा करूनही वाळू मिळत नसल्याची ओरड सुरू आहे.
या पद्धतीमुळे वाळूचा काळा बाजार जाेरात सुरू झाला असून, वाळूचा भाव वाढत चालला आहे. तसेच गाडी भाड्यात एक हजार रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे प्रति ब्रास अडीच ते साडेतीन हजाराने वाळू विकली जात आहे. त्यासाठी छोटे-मोठे एजंट सक्रिय झाले आहेत. वाळूच्या टोकणसाठी काहीही करू नका, फक्त पैसे द्या, या पद्धतीने हे एजंट काळ्या बाजारातील वाळूचा प्रचार प्रसार करत आहेत. त्यासाठी काही नागरिकांचे आधारकार्ड मिळवण्याकरीता एजंटांमध्ये नवी स्पर्धा सुरू झाली आहे. काहींनी तर नातेवाइकांचे आधारकार्ड मिळवून नवा व्यवसायच सुरू केला आहे. या प्रकाराबाबत तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.