कामबंद आंदोलनात संगमेश्वर कोतवाल संघटना सहभागी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 02:25 PM2018-11-23T14:25:55+5:302018-11-23T14:27:29+5:30
महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद सुरू केले आहे.
देवरूख : महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने नाशिक येथे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चतुर्थ श्रेणीच्या मागणीसाठी बेमुदत कामबंद सुरू केले आहे. संगमेश्वर तालुक्यातील सर्व कोतवाल या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी झाले आहेत.
महसूल विभागात २४ तास काम करणारा कर्मचारी म्हणून कोतवाल सर्वांच्या परिचयाचा आहे. गाव, तहसील, एसडीओ आॅफिस, जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी सदैव कोतवाल काम करत असतो. सुमारे ४० वर्षांपासून कोतवाल चतुर्थ श्रेणीसाठी लढत आहे. आजपर्यंत शेकडो आंदोलने झाली उपोषणे केली. पायी वर्धा ते नागपूर, नाशिक ते मुंबई अशी आंदोलने केली पण सरकारने अजून त्यांना न्याय दिला नाही. शेवटचा लढा म्हणून कोतवाल कामबंद आंदोलन करत आहेत. जोपर्यंत चतुर्थ श्रेणी मिळणार नाही तोपर्यंत कोतवाल कामबंद आंदोलन सुरू ठेवणार असा ठाम निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने लवकरात लवकर कोतवाल यांच्या मागण्या मंजूर कराव्या अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार आंदोलनकर्ते यांनी घेतला आहे.
या आंदोलनासाठी आतापर्यंत अनेक शासकीय कर्मचारी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामध्ये विदर्भ पटवारी संघ नागपूर, तृतीय श्रेणी कर्मचारी महाराष्ट्र राज्य, चतुर्थ श्रेणी कर्मचारी महाराष्ट्र राज्य या संघटनांनी कोतवाल यांची चतुर्थ श्रेणीची मागणी रास्त असून त्यांचा सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्या असे म्हटले आहे. दोन दिवसात चतुर्थ श्रेणी अहवालावर स्वाक्षरी करून आमचा प्रश्न मार्गी लावावा अन्यथा आम्ही सर्व महाराष्ट्रातील कोतवाल कामबंद आंदोलन अधिक तीव्र करण्यात आमरण उपोषण करण्याचे ठरवले आहे.