संगमेश्वर तालुका : तेवीस दवाखान्यांचा कारभार आठ अधिकाऱ्यांकडे
By admin | Published: July 16, 2014 10:33 PM2014-07-16T22:33:30+5:302014-07-16T22:41:50+5:30
पशुधन विभागात तब्बल १५ पदे रिक्त
मार्लेश्वर : संगमेश्वर पंचायत समितीच्या पशुधन विभागातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची तब्बल १५ पदे रिक्त आहेत. शासनाने ही पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
संगमेश्वर तालुका विस्तीर्ण असून, डोंगराळ भागात वसलेला आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागातील लोकांची उपजीविका शेतीवरच चालते. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी पशुपालन, शेळीपालन, कुक्कुटपालन करुन आपली आर्थिक गरज भागवतात. शासनही शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न करत आहे.
तालुक्यामध्ये एकूण २३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र, यापैकी केवळ ८ दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. उर्वरित १५ दवाखान्यांमध्ये अधिकारी नेमण्यात आले नाहीत. त्यामुळे २३ दवाखान्यांचा कारभार ८ अधिकाऱ्यांना हाकावा लागत असल्याचे चित्र आहे. त्यातच पशुसंबंधी काही तक्रारी असल्यास शेतकरी आपल्या पशुला थेट दवाखान्यात न आणता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाच आपल्या दारी पाचारण करतात. परिणामी एकाचवेळी दोन तक्रारी आल्यास या अधिकाऱ्यांना धावाधाव करावी लागते. त्यामुळे त्यांची चांगलीच दमछाक होते, तर शेतकऱ्यांचीही गैरसोय होत आहे.
तालुक्यातील २३ दवाखान्यांचा कारभार अधिकाऱ्यांना सांभाळावा लागतो. त्यामुळे येथे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. ही स्थिती लक्षात घेऊन शासनाने १५ पदे त्वरित भरून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे. (वार्ताहर)