संगमेश्वर तालुक्याला वादळाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:32 AM2021-05-18T04:32:48+5:302021-05-18T04:32:48+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क देवरुख : रविवारी झालेल्या ताेक्ते वादळाने संगमेश्वर तालुक्यात सोमवारी सकाळी १२ वाजेपर्यंत तब्बल साडेसात लाखांचे नुकसान ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : रविवारी झालेल्या ताेक्ते वादळाने संगमेश्वर तालुक्यात सोमवारी सकाळी १२ वाजेपर्यंत तब्बल साडेसात लाखांचे नुकसान झाल्याचा आकडा हाती आला आहे. यात घरे, गोठे, सार्वजनिक सभागृह, शौचालये यांचे मोठे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने महावितरणचे मोठे नुकसान झाले असून, २४ तास उलटूनही संगमेश्वर तालुका अंधारातच आहे. महावितरण वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.
देवरुख तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार, संगमेश्वर तालुक्यातील ४५ घरांचे सुमारे ६ लाख रुपये तर ४ गोठे, १ सार्वजनिक पाण्याची टाकी, १ रिक्षा, १ शेतघर, १ शाळा, २ शौचालये, साडवली दूध शीतकरण केंद्र असे सगळे मिळून ७ लाख ५३ हजार ६५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळीच तालुक्यात वादळाची चाहुल लागली होती़. मात्र, पाऊस किंवा वारा फारसा नव्हता. सकाळी ११नंतर जोरदार वारा वाहू लागला व दुपारनंतर तालुक्यातील बहुतांशी गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. संध्याकाळी ५ वाजल्यानंतर तालुक्यात वादळाने चांगलेच धुमशान घातले. रात्री उशिरापर्यंत तालुक्यात पाऊस आणि वारा सुरु होता. रविवारी दुपारी खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी संध्याकाळपर्यंत सुरळीत झालेला नव्हता. आरवली ते संगमेश्वर या ३३ के. व्ही. वीज वाहिनीत बिघाड झाला असून, तो दुरुस्त करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.
देवरुख परिसरात पाच ठिकाणी झाडे कोसळल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे घरांवरची कौले - पत्रे उडणे, घरावर झाडे कोसळणे यामुळे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये साेमवारी दुपारीही मुसळधार पाऊस कोसळत हाेता़.