संगमेश्वरची मतदार संख्या दीड लाखांवर
By Admin | Published: May 16, 2016 12:32 AM2016-05-16T00:32:53+5:302016-05-16T00:36:09+5:30
निरंतर नोंदणी : दीड महिन्यात ५१९ नवीन मतदार
देवरूख : संगमेश्वर तालुक्यात निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमांतर्गत निरंतर मतदार नोंदणी कार्यक्रम घेण्यात आला आहे. यामध्ये दीड महिन्यात तब्बल ५१९ नवीन मतदारांनी नोंदणी करून घेतली आहे. यामुळे तालुक्याची मतदार संख्या सद्यस्थितीला १ लाख ५५ हजार २१६ वर जावून पोहचली आहे.
निवडणूक आयोग यापूर्वी निवडणूकांपूर्वी मतदार यादीची तपासणी करत असे. मात्र, आयोगाने यात बदल करून एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी मतदार यादी दुरूस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. या कार्यक्रमांतर्गत नवीन मतदारांची नोंदणी करण्यास प्रारंभ झाला आहे. यातील सुरुवातीच्या दीड महिन्यामध्ये नवीन मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे.
याअंतर्गत एकूण ५१९ नवीन मतदारांनी आपली नोंदणी करून घेतली असून, चिपळूण मतदारसंघात ४११, रत्नागिरी मतदारसंघात ५५, राजापूर मतदारसंघात ५३ मतदारांनी नोंदणी केली आहे. संगमेश्वर तालुका हा तीन मतदार संघांमध्ये विभागला गेल्याने नोंदणीदेखील या मतदारसंघानुसार केली जाते.
तालुक्याची यापूर्वीची मतदार संख्या १ लाख ५४ हजार ६९७ होती. ही संख्या चिपळूण मतदारसंघात १ लाख १२ हजार १२३, रत्नागिरी मतदारसंघात २१ हजार ३२७ व राजापूर मतदारसंघात २१ हजार २४७ अशी होती.
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार प्रत्येक केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे नवीन मतदारांची नावे नोंदविणे, छायाचित्रात बदल, पत्त्यात बदल, नावात बदल अशी दुरूस्ती करणे व मयत मतदारांची नावे वगळणे, असा कार्यक्रम सुरू आहे.
एप्रिल ते जुलै असा हा कार्यक्रम असून, नागरिकांनी आपल्या मतदार यादीत यापैकी काही बदल करावयाचे असल्यास मतदान केंद्र अधिकारी व तालुका निवडणूक कार्यालयाकडून हे बदल व नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)