९६९ शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 06:23 PM2020-02-29T18:23:30+5:302020-02-29T18:24:25+5:30
जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण विभाग आणि पाणी व स्वच्छता विभाग यांनी जिल्ह्यातील १३ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १ कोटी १६ लाख रुपये खर्च करुन सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात येणार आहेत़
रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे दोन्ही शिक्षण विभाग आणि पाणी व स्वच्छता विभाग यांनी जिल्ह्यातील १३ हजार विद्यार्थिनींना मोफत सॅनिटरी नॅपकीन वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेमधून नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यातील ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १ कोटी १६ लाख रुपये खर्च करुन सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविण्यात येणार आहेत़
आरोग्याची काळजी कशी घ्यावी व मासिक पाळीच्या काळात काळात काय काळजी घ्यावी, याबाबत विद्यार्थिनींना शाळांमध्येच शिक्षक तसेच आरोग्य विभागामार्फत मार्गदर्शन करण्यात येते़ काही माध्यमिक शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकीनच्या मशीन बसविण्यात आल्या आहेत़ विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन मोफत देण्यात येतात, तर काही शाळांमध्ये ५ रुपये घेऊन सॅनिटरी नॅपकीनचे वाटप करण्यात येते़
विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन मोफत देता यावेत, यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेतही मंजूरी घेण्यात आली आहे़ तयासाठी १ कोटी १६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे़ जिल्ह्यात इयत्ता पाचवीपासून पुढील इयत्तांमधील विद्यार्थिनी असलेल्या ९६९ प्राथमिक शाळांमध्ये १३ हजार विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत़ या विद्यार्थिनींना आरोग्य विषयक माहितीही शिक्षकांकडून देण्यात येत आहे़ खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका प्राथमिक शाळेमध्ये तर एका शिक्षिकेने स्वत: विद्यार्थिनींसाठी खोली तयार केली आहे़ मासिक पाळी आलेल्या विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीनही मोफत देण्यात येत आहे़
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या वेळी सॅनिटरी नॅपकीनची सोय करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषदेने पावले उचलली आहेत़ त्यासाठी एका शाळेमध्ये सॅनिटरी नॅपकीन मशीन बसविणेसाठी सुमारे १२ हजार रुपये खर्च येणार आहे़ जिल्हा परिषदेकडून नाविन्यपूर्ण योजनेतून खरेदी करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे सादर केला आहे़
आरोग्याच्या स्वच्छतेसाठी
किशोरवयीन मुलींमध्ये शारीरिक, मानसिक, भावनिक बदल होतात़ त्यात मासिक पाळी सुरु होणे, हा महत्त्वाचा टप्पा आहे़ त्यात योग्य माहितीच्या अभावी मुलींना मासिक पाळी सुरु झाल्यानंतर नैराश्य येणे, उदासीनता येणे, शारीरिक अस्वच्छता व त्याबाबत कोणती काळजी घ्यावी, याबाबत असलेल्या अज्ञानामुळे आरोग्यविषयक विविध समस्यांना तोंड द्यावे लागते.
ग्रामीण भागामध्ये अज्ञानाच्या कारणाने किशोरवयीन मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होतो़ तसेच या काळात स्वच्छता न ठेवल्याने आजारांना सामोरे जावे लागते़ ही बाब लक्षात घेऊन जिल्हा परिषदेने विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकीन मशीन घेऊन त्याद्वारे सॅनिटरी पॅड पुरविण्याचा निर्णय घेतला आहे़