स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:23 AM2021-06-04T04:23:47+5:302021-06-04T04:23:47+5:30
राजापूर : येथील टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनने गंगातीर्थ क्षेत्री स्वच्छता मोहीम राबवली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असोसिएशन सातत्याने विविध उपक्रम ...
राजापूर : येथील टु व्हिलर मेकॅनिक असोसिएशनने गंगातीर्थ क्षेत्री स्वच्छता मोहीम राबवली. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून असोसिएशन सातत्याने विविध उपक्रम राबवत असते. यावेळीही तीर्थक्षेत्र आणि परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यापुढे दरवर्षीच ही मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे.
रात्री होतेय वाळू उत्खनन
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील गडनदीपात्रातील वाळू उपशासाठी आता माफियांनी रात्रीची वेळ निवडली आहे. तालुक्याच्या मुख्य मार्गावरुन मध्यरात्रीनंतर पहाटेच्या सुमारास वाळू वाहतूक होत आहे. मात्र, याकडे महसूल तसेच पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
मान्सूनची प्रतीक्षा
रत्नागिरी : मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत हवामान खात्याकडून देण्यात आले आहेत. केरळमध्ये तसे वातावरणही निर्माण झाले आहे. महाराष्ट्रात अंदाजे ११ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे आता कोकणवासीयांना मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
शिधावाटप
गुहागर : पनवेल येथील मनप्रवाह ट्रस्टतर्फे शहरातील ३० गरीब आणि गरजू कुटुंबांना नुकतेच शिधावाटप करण्यात आले. भंडारी भवनमधील कै. इंदिराबाई वासुदेव शेट्ये सभागृहात प्रातिनिधीक स्वरुपात हा शिधा वितरीत करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक कुटुंबाला घरपोच वितरण करण्यात आले.
वीजखांब बदलण्यास प्रारंभ
दापोली : निसर्ग चक्रीवादळात पडलेले आंजर्ले येथील विजेचे खांब नवीन खांब बसविल्यानंतरही तसेच ठेवण्यात आले होते. १० महिन्यांच्या कालावधीनंतरही हे जुने खांब तसेच राहिल्याने महावितरणकडे सातत्याने तक्रार करण्यात आली होती. अखेर गावातील जुने खांब काढण्यास सुरुवात झाली आहे.
शालेय साहित्य खरेदी ठप्प
खेड : दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु होतात. त्यामुळे या आठवड्यात शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत विद्यार्थ्यांसह पालकांची गर्दी व्हायची. मात्र, गतवर्षीपासून शाळा बंद असल्याने शालेय साहित्याची खरेदी थंडावली आहे.
बसफेऱ्या बंद
खेड : येथील बसस्थानकातून सकाळी १० वाजता सुटणारी खेड - बोरिवली - नालासोपारा आणि खेड - पुणे - पिंपरी - चिंचवड, खेड - रत्नागिरी या गाड्या दि. ३ ते ९ जून या लॉकडाऊनच्या काळात बंद ठेवण्यात आल्या आहेत. पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर बंद केलेल्या लांबपल्ल्याच्या गाड्या पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत.
बिया संकलन स्पर्धा
देवरुख : येथील सबला प्रतिष्ठानतर्फे शहर परिसरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी बिया संकलन स्पर्धा आयोजित केली आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील देशी झाडांच्या बिया गोळा करुन स्वच्छ करुन त्या कोरड्या कराव्यात. या बिया स्वतंत्र पाकिटात ठेवून प्रत्येक महिन्याच्या १ ते २८ तारखेपर्यंत अरिहंत मेडिकल, साडवली येथे आणून द्याव्यात.
गृहउद्योगाला फटका
दापोली : गेल्यावर्षी निसर्ग चक्रीवादळाने तर यावर्षी तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यावर मोठे संकट निर्माण केले आहे. या वादळाचा फटका पर्यटन क्षेत्रासह लघु उद्योगालाही मोठ्या प्रमाणावर बसला आहे. त्यामुळे अनेक छोटे - मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. कोट्यवधींची होणारी उलाढालही थंडावली आहे.
रस्त्यांवर शुकशुकाट
लांजा : प्रशासनाने दि. ३ ते ९ जून या कालावधीत कडक लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. आठवडाभर लॉकडाऊन होणार असल्याने ग्रामीण भागातील जनतेने आधीच सर्व वस्तूंची खरेदी करुन ठेवली होती. मात्र, ग्रामीण भागात अजूनही घरपोच सेवा नसल्याने दुधासारख्या वस्तूंची गैरसोय होत आहे.