सॅनिटायझर मशीन भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:22 AM2021-07-20T04:22:32+5:302021-07-20T04:22:32+5:30
नेत्रदान सुविधा सुरू रत्नागिरी : येथील लायन्स क्लब नेत्र रुग्णालयात नेत्रदानाची सुविधा सुरू केली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा ...
नेत्रदान सुविधा सुरू
रत्नागिरी : येथील लायन्स क्लब नेत्र रुग्णालयात नेत्रदानाची सुविधा सुरू केली आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक लोकांनी नेत्रदानाचा संकल्प करून तेथे नावे नोंदविण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी लायन्स नेत्र रुग्णालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
एचआयव्ही बाधितांचे लसीकरण
देवरूख : येथील ग्रामीण रुग्णालयात एचआयव्ही बाधित व्यक्तींसाठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण आयोजित करण्यात आले होते. ३१ एचआयव्ही बाधितांना लस देण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.आस्मा बैरागदार उपस्थित होत्या.
कामगारांचे प्रश्न सोडवावेत
राजापूर : एसटी कामगारांचे विविध प्रश्न प्रलंबित असून, त्यांची सोडवणूक करण्याऐवजी त्याबाबत स्थानिक राजापूर आगार प्रशासन व विभागीय एसटी प्रशासन टोलवाटोलवी करीत असल्याने, कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
परीक्षा लांबणीवर
रत्नागिरी : जी मेन या इंजिनीअर एंट्रन्स परीक्षेचा चाैथा टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. या टप्प्यातील परीक्षा दि. २६, २७ व दि. ३१ ऑगस्ट, तसेच दि. १ आणि २ सप्टेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. परीक्षेची नाेंदणी अद्याप सुरू असून, दि. २० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिवसंपर्क अभियान
लांजा : तालुक्यात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियानास प्रारंभ झाला आहे. भांबेड, प्रभानवल्ली, वेरवली, देवधे, लांजा शहर येथे शिवसंपर्क अभियानाबाबत बैठका घेण्यात आल्या.
वारीच्या विरोधाचा निषेध
राजापूर : वारकऱ्यांच्या पंढरपूर वारीला शासनाचा विराेध, वारकऱ्यांवर अत्याचार, भागवत धर्माच्या पताकांचा अपमान व ज्येष्ठ कीर्तनकार हभप बंडातात्या कराडकर यांना केलेल्या नजरकैदेचा तालुक्यातील विश्व हिंदू परिषद प्रखंड राजापूर व वारकरी समाज संप्रदायातर्फे निषेध करण्यात आला.
खडीमुळे अपघाताचा धोका
आरवली : मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली-संगमेश्वर रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. खड्डे खडी टाकून भरण्यात आले होते. मात्र, वाहनांच्या वर्दळीमुळे खडी बाहेर आली असून, खड्डे पुन्हा उखडली आहे. खडी रस्त्यावर सर्वत्र पसरली असल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
एसटीची मागणी
दापोली : दापोलीतून मुंबई, ठाणे, पुणे येथे जाण्याकरिता सकाळी लवकर आंबेत मार्गे गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत अनंत सणस यांनी दापोली आगार व्यवस्थापक मृदुला जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे. ७१ नागरिकांच्या सह्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
रमेश मोहिरे यांची नियुक्ती
चिपळूण : सावर्डे ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ लिपिक रमेश आत्माराम मोहिरे यांची गुहागर तालुक्यातील खामशेत येथे ग्रामसेवकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने रमेश मोहिरे यांचे अभिनंदन करण्यात आले. सरपंच समीक्षा बागवे, उपसरपंच जमीर मुल्लाजी उपस्थित होते.