नळपाणी योजनेला श्रमदानातून संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 01:15 PM2019-11-16T13:15:14+5:302019-11-16T13:16:00+5:30
श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.
देवरुख : श्रमदान हे श्रेष्ठदान याची अनुभूती आलेल्या गावाने एकीच्या जोरावर लोकसहभागातून वाडीच्या नळपाणी योजनेला नवसंजीवनी दिली आहे. संगमेश्वर तालुक्यातील मानसकोंड फेपडेवाडीने दहा वर्षांच्या या नळपाणी योजनेला उर्जितावस्था दिली असून, श्रमदानातून केलेल्या या कामाचा आदर्श दशक्रोशीमध्ये घेण्यासारखा आहे.
तालुक्यातील मानसकोंड हे गाव मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले आहे. गावात यापूर्वी पाण्याचे दुर्भिक्ष्य होते. मात्र, देवरुख येथील मातृमंदिर संस्थेचे तत्कालिन कार्याध्यक्ष कै. भाऊ नारकर यांच्या मार्गदर्शनामुळेच या वाडीतील महिलांच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरला आहे. विजय नारकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामसमिती फेपडेवाडीने लोकसहभाग आणि देणगीदारांच्या सहकार्यातून २५ जानेवारी २००९ रोजी वाडीतील ८० कुटुंबांना नळपाणी योजना कार्यान्वित केली.
गावाची एकी असेल तर कोणतेही काम सहज करता येते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही फेपडेवाडी होय. या वाडीने एकत्र येत महिलांना करावी लागणारी पाण्यासाठीची पायपीट थांबविली आहे. यामध्ये स्थानिकांसह मुंबईस्थित ग्रामस्थांबरोबरच तरुणांचे योगदानदेखील महत्त्वाचे आहे. इतर शासकीय योजनांपेक्षा या वाडीने श्रमदानातून केलेली ही योजना दहा वर्षे अखंडितपणे सुरु आहे. या योजनेच्या देखभालीचे काम स्थानिक ग्रामस्थच करीत असतात.
दहा वर्षे झाल्यामुळेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आणि दि. १० नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा श्रमदानातून हे काम करण्यात आले. अनेक ठिकाणचे जॉईट्स बदलण्यात आले आहेत. प्रारंभी असलेला उत्साह आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. योजनानिर्मितीचा उत्साह, जोश जसा होता तसाच आजही दुरुस्तीकामी श्रमदानातून दिसून येतो आहे. गावाच्या विकासासाठी नियोजनबध्द केलेले श्रमदान गावच्या विकासास हातभार लावणारे ठरत आहे.
पाणीटंचाई केली दूर
मानसकोंड फेफडेवाडी येथील ज्येष्ठ ग्रामस्थ गणुजी फेपडे तसेच पाणी कमिटी व सर्व वाडीतील स्थानिक मुंबईकर यांचे सतत सहकार्य लाभत आहे. त्यामुळेच गेली अकरा वर्षे ८० कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करणे सहजशक्य झाले आहे. या वाडीने लोकसहभाग आणि श्रमदानाने या योजनेची दुरूस्ती केली असून इतरांसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.