मधुमेहाच्या रुग्णांसाठी सापडली ‘संजीवनी’, प्रा. अश्विनी पाटील यांच्या संशोधनास भारत सरकारकडून मिळाले पेटंट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 01:51 PM2023-03-22T13:51:18+5:302023-03-22T13:59:53+5:30
मधुमेह आजारावरील औषधासाठी त्या गेले ३ वर्षे संशोधन करत होत्या
चिपळूण : तालुक्यातील सावर्डेतील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात केमिस्ट्री विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा. अश्विनी पाटील यांना ‘बायलेअर फ्लोटिंग टॅबलेट ऑफ लोसरटॅन ॲंड मेटफॉर्मिन युसिंग नॅचरल पॉलिमर्स’ या संशोधनकार्यास भारत सरकारकडून पेटंट देण्यात आले आहे. हे औषध मधुमेहाच्या रुग्णांसाठी एक संजीवनी ठरू शकते, अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी दिली.
हे संशोधन औषधनिर्माण शाखेतील एक अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. या संशोधन कार्यात लोसारटॅन नावाच्या ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधाचे इमिडीएट रिलीज तसेच मेटफॉर्मिन नावाच्या ब्लड शुगर कंट्रोल करणाऱ्या औषधाचे सस्टेन रिलीज लेयर असणारी एक बायलेअर टॅबलेट बनवण्यात आली आहे. तिच्या ड्रग रिलीजचा अभ्यास करण्यात आला.
सिन्थेटिक पोलिमरपेक्षा नैसर्गिक पॉलिमर्सचा औषधांच्या रिलीज प्रोफाइलवर कशा पद्धतीने चांगला परिणाम होतो हे अभ्यासण्यात आले. तसेच नैसर्गिक पॉलिमरच्या वाढत्या कॉन्सन्ट्रेशनचा औषधाच्या रिलीजवर होणारा परिणामही अभ्यासण्यात आला आहे. जो मेटफार्मिनसारख्या कमी ॲबसॉपशन विंडो असणाऱ्या औषधांच्या सस्टेन रिलीजसाठी खूप महत्त्वाचा आहे. या संशोधन कार्यात प्रा. अश्विनी पाटील यांच्यासोबत प्रा. मदन पोमाजे, अखिल काणेकर व श्वेता शिरोडकर यांचाही सहभाग होता. या संशोधनाबद्दल सह्याद्री शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, सचिव महेश महाडिक, प्राचार्य डॉ. अनिल बत्तासे यांनी विशेष कौतुक केले आहे.
अश्विनी पाटील मूळच्या कोल्हापूरच्या
प्रा. पाटील या मूळच्या कोल्हापुरातील कुरुंदवाड येथील रहिवाशी आहेत. त्या सावर्डे ता. चिपळूण येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात गेले १५ वर्षे कार्यरत आहेत. मधुमेह आजारावरील औषधासाठी त्या गेले ३ वर्षे संशोधन करत होत्या. अखेर त्यांच्या या संशोधनाला यश मिळाले असून भारत सरकारने आता त्यांना पेटंटही दिले आहे.