संक्रांतीला रत्नागिरीतून हलव्याचे दागिने पोहोचले अमेरिकेत, अन् सूनबाईची हौस झाली पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 05:46 PM2022-01-14T17:46:27+5:302022-01-14T17:46:51+5:30
संक्रांत म्हटले की, तिळगुळ, त्याचे लाडू, काळी साडी या गोष्टी हव्याच
रत्नागिरी : संक्रांत म्हटले की, तिळगुळ, त्याचे लाडू, काळी साडी या गोष्टी हव्याच. त्याबरोबरच नववधू हलव्याचे दागिने घालून साजशृंगार करतानाही दिसतात. हलव्याचे हे दागिने चक्क सातासमुद्रापार अमेरिकेत पोहोचले आहेत.
महाराष्ट्रात या सर्व गोष्टी उपलब्ध होतातच. पण नववधूची संक्रांत तीही अमेरिकेत असेल तर तिला हवा असणारा हलव्याच्या दागिन्यांचा शृंगार तिकडे कसा मिळणार हा मोठा प्रश्न होता. रत्नागिरीतील डॉ. कल्पना मेहता यांच्या मैत्रिणीच्या सुनेसाठी हलव्याचे दागिने पाहिजेत, असे सांगितले. डॉ. कल्पना मेहता यांना रत्नागिरीत रेवा सावंत हलव्याचे दागिने करत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी हे दागिने घेऊन मैत्रिणीच्या सुनेसाठी पाठवून दिले.
रत्नागिरीतील डॉ. कल्पना मेहता यांनी रेवा सावंत यांचे हे दागिने थेट अमेरिकेतील एका सूनबाईला पाठवून तिची हौस पूर्ण केली आहे. रत्नागिरीतून पोचलेल्या या हलव्याच्या दागिन्यांमुळे अमेरिकेत राहणाऱ्या या सूनबाईना जणू इथल्या मायेची ऊब मिळाली आहे.
रेवा सावंत यांनी सांगितले की, मी गेल्या दोन वर्षांपासून हलव्याचे दागिने करत आहे. रत्नागिरीत त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी हे दागिने अमेरिकेत पोहोचल्याने मला अजूनही उत्साह आल्याचे त्या म्हणाल्या. रेवा सावंत ४ वर्षाच्या बाळापासून ते नववधूपर्यंत सर्वांसाठी दागिने तयार करतात. नववधूसाठी मंगळसूत्र, हार, बांगड्या, नथ असे दागिने त्या तयार करतात.
डॉ. कल्पना मेहता म्हणाल्या की, संक्रांतीच्या निमित्ताने सोन्यापेक्षाही एक वेगळा अलंकार गृहिणींना माहित आहे, तो म्हणजे हलव्याचे दागिने. जुन्या गोष्टींना पुन्हा नाविण्य आले आहे. मैत्रिणीच्या सूनेने हलव्याचे दागिने मिळतील का, असे विचारले. सातासमुद्रापार आपले सण आनंदाने साजरे केले जातात ही गोष्ट आनंदाची आहे.