राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे संत रोहिदास महाराज जयंतीदिनी कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2018 02:09 PM2018-02-02T14:09:58+5:302018-02-02T14:10:32+5:30
संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे.
राजापूर : संतांनी धर्माचा प्रचार करताना कधी जातीभेद किंवा वर्णभेद केला नाही. हिंदू धर्मातील सर्वच संतांनी ईश्वर हा एकच आहे, असे सांगितले आहे. माणसानेच जातीभेद निर्माण करून समाजात दरी निर्माण केली आहे. संत रोहिदास महाराजांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही तर आई - वडिलांची सेवा हीच ईश्वरसेवा आहे, अशी शिकवणही दिली. संत रोहिदास हे त्याकाळातील आधुनिक संत होते, असे मत प्रमुख वक्ते दिलीप गोखले यांनी व्यक्त केले.
राजापूर तालुका चर्मकार समाज सेवा संघातर्फे राजापूर नगरवाचनालयाच्या सभागृहात संत रोहिदास जयंती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून दिलीप गोखले बोलत होते. संत रोहिदास यांचे जीवन व कार्य यावर बोलताना त्यांनी आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य केले. ते पुढे म्हणाले की, संतांनी दिलेल्या शिकवणीचे आपण सर्वांनी आचरण केले असते, तर समाजात ही जातीभेदाची दरी निर्माणच झाली नसती. या समाजाने अनंत काळापासून पायाची काळजी घेऊन सर्वांचे आरोग्य समृद्ध ठेवण्याचे काम केले आहे. या समाजाचे सर्वांवरच ऋण आहेत, असे त्यांनी सांगितले.
दीपक मेढेकर यांनी तालुक्यात लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्ष होताना पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे सांगितले. तसेच मे महिन्यात संघटना रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर संघाचे तालुकाध्यक्ष दीपक मेढेकर यांच्यासह संदीप मोरवसकर, दीपक धामापूरकर, रमाकांत मेढेकर, प्रकाश गजापकर, चंद्रकांत देवरूखकर, रघुनाथ आडिवरेकर, अरूण आडिवरेकर, पांडुरंग चव्हाण, दीपक डोंगरकर, चंद्रकांत पवार, संदीप परटवलकर उपस्थित होते. त्याचबरोबर भास्कर धामापूरकर, अनंत मोरवसकर, संतोष कदम, अनंत देवरूखकर, भागिर्थी मेढेकर यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रभाकर चव्हाण यांनी तर आभार दीपक धामापूरकर यांनी मानले.
निबंध, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान-
निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेतील पहिले तीन क्रमांक पुढीलप्रमाणे : निबंध स्पर्धा : पहिली ते पाचवी - प्रांजल संदीप मोरवसकर, स्नेहल संदीप परटवलकर, प्राची दीपक धामापूकर, सहावी ते आठवी - मधुरा संदीप मोरवसकर,गायत्री अनिल चव्हाण, तनिष्का विजय चव्हाण, नववी ते बारावी - उदय महादेव धामापूरकर, अक्षय जयवंत नारकर व संतोषी केशव गोवळकर, मानसी अनिल चव्हाण. वक्तृत्व स्पर्धा : पहिली ते पाचवी - तन्मय अरूण आडिवरेकर, सोहम प्रशांत आडिवरेकर, प्राची दीपक धामापूरकर, सहावी ते आठवी - सानिया महेंद्र धामापूरकर यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.