संतसेना महाराज पुण्यतिथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:37 AM2021-09-04T04:37:41+5:302021-09-04T04:37:41+5:30
लांजा : शहरात संतसेना महाराजांची ३८वी पुण्यतिथी यंदा साधेपणाने केली जाणार आहे. नाभिक वाडीतील लक्ष्मण यादव यांच्या निवासस्थानी ही ...
लांजा : शहरात संतसेना महाराजांची ३८वी पुण्यतिथी यंदा साधेपणाने केली जाणार आहे. नाभिक वाडीतील लक्ष्मण यादव यांच्या निवासस्थानी ही पुण्यतिथी आयोजित करण्यात आली आहे. कोरोनाच्या अनुषंगाने साधेपणाने हा कार्यक्रम होणार आहे. यासाठी चव्हाण, सावंत, यादव, जाधव, मोरे, शिंदे, पवार आदी समाजबांधव आयोजन करीत आहेत.
खुलेआम गुटखाविक्री
खेड : शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाल्याची विक्री होत आहे. अनेक तरुण या व्यसनाच्या आहारी गेले आहेत. गुटखा आणि पान मसाला यांची विक्री छुप्या पद्धतीने होत असून, काही कोडचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र शासनाने गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असतानाही अनेक टपऱ्यांवर याची राजरोस विक्री होत आहे.
चेकपोस्टवर खड्डे
दापोली : शहरातील बुरोंडी पोलीस चेकपोस्टसमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्यापूर्वी हे खड्डे तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात आले होते. मात्र मुख्य महामार्गावरून वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने काही दिवसातच हे खड्डे उखडले गेले. सध्या पाऊस सुरू असल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे.
निबंध स्पर्धा बक्षीस वितरण
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, दि.५ सप्टेंबर रोजी होणार आहे. खेडशी गयाळवाडी येथील रवींद्र इनामदार यांच्या दुर्वांकुर या निवासस्थानी विज्ञान मंडळाच्या कार्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
खो-खो स्पर्धेसाठी निवड
देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आठल्ये सप्रे पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातील दहा विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शेगाव अहमदनगर येथील ४७व्या राज्य अजिंक्य स्पर्धेत हे खेळाडू सहभागी होणार आहेत. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.