पंढरपूरचे संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मंत्री उदय सामंतांनी वारकरी संप्रदायाला दिलं आश्वासन
By मेहरून नाकाडे | Published: February 6, 2024 04:14 PM2024-02-06T16:14:38+5:302024-02-06T16:14:55+5:30
रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असताना पैठणला संतपीठ करता आले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा ...
रत्नागिरी : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री असताना पैठणला संतपीठ करता आले. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केली असून, पंढरपूर मंदिर ॲक्टमधील संतपीठ केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे आश्वासन राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी साेमवारी वारकरी संप्रदायाला दिले.
रत्नागिरी नगरपरिषदेतर्फे शहरातील शिर्के उद्यानात उभारण्यात आलेल्या विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण साेमवारी सायंकाळी करण्यात आले. त्यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी व्यासपीठावर संत साहित्य संमेलनाध्यक्ष हभप माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हभप विठ्ठल पाटील, हभप बापूसाहेब महाराज देहूकर, हभप निवृत्ती महाराज नामदास, सरदार उर्जितसिंह शितोळे, हभप मनोहर महाराज औटी, हभप देविदास महाराज ढवळीकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, आज वारकऱ्यांच्या हस्ते झालेला सत्कार हा आजवरचा सर्वांत मोठा सत्कार आहे. त्याला गालबोट लागेल, असे कृत्य माझ्या हातून होणार नाही. वारीनंतर रत्नागिरीत प्रथम अश्व आला, पहिले रिंगण झाले, पंढरपूरच्या वारीचा अनुभव समस्त रत्नागिरीकरांना घेता आला. वारकरी संप्रदायाने महाराष्ट्राला संस्कार दिले, महाराष्ट्र घडवला. तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असणाऱ्या माउलींचे सदैव स्मरण होण्यासाठी विठ्ठलाची मूर्ती इथे उभारण्यात आली आहे. आजच्या सोहळ्याने वारी केल्याचे भाग्य लाभल्याचे ते म्हणाले.
यावेळी वारकरी साहित्य परिषदेतर्फे श्री विठ्ठलाची चांदीची मूर्ती देऊन मंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून हभप मनोहर महाराज औटी, हभप देविदास महाराज ढवळीकर तसेच जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्याधिकारी तुषार बाबर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे प्राध्यापक काकडे यांचाही सत्कार करण्यात आला.
अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी आभार प्रदर्शन केले. पसायदानाने सोहळ्याचा समारोप करण्यात आला. त्यानंतर हभप बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन झाले.