Ratnagiri: जमिनीच्या वादातून सरपंचांकडून सहायक व्यवस्थापकावर वार, दापोली तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 05:47 PM2024-03-29T17:47:22+5:302024-03-29T17:47:52+5:30
दापोली : जमिनीच्या वादातून लाेढा कंपनीच्या सहायक व्यवस्थापकावर पाडले (ता. दापाेली) गावातील सरपंचांनी धारदार हत्यारांनी वार केल्याची घटना गुरुवारी ...
दापोली : जमिनीच्या वादातून लाेढा कंपनीच्या सहायक व्यवस्थापकावर पाडले (ता. दापाेली) गावातील सरपंचांनी धारदार हत्यारांनी वार केल्याची घटना गुरुवारी सकाळी इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा.लि.च्या साईटवर घडली. या हल्ल्यात सुभाष राजेंद्र लाेणारी (३६) हे जखमी झाले असून, त्यांच्यावर दापाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या हल्ल्याप्रकरणी सरपंच रवींद्र सातनाक यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सुभाष राजेंद्र लोणारी हे आंजर्ले पाडले गावच्या सीमेवरील शार्प स्किल इन्फ्रा डेव्हलपमेंट प्रा.लि. या कंपनीच्या साईटवर लायझनिंग प्रमुख म्हणून काम पाहतात. या साईटचे काम सुरू असल्यापासून पाडले गावचे सरपंच रवींद्र सातनाक हे वरिष्ठ अधिकारी दीपेंद्र गुप्ता यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात पैसे घेत होते. दीपेंद्र गुप्ता यांची बदली झाल्याने दीड महिना त्यांचे कामही सुभाष लाेणारी पाहत आहेत.
गुरुवारी सकाळी रवींद्र सातनाक यांनी साईटवर सुरू असलेल्या कामाबद्दल खंडणी स्वरूपात पैशांची मागणी केली. हे पैसे देण्यास सुभाष लाेणारी यांनी नकार दिला. त्यानंतर सातनाक यांनी धमकी देत चाकूने छातीवर व दंडावर वार केले. या हल्ल्यात सुभाष लोणारी हे गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ दापाेली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच दापाेलीचे पोलिस अधिकारी आर. बी. मोहिते यांनी रुग्णालयात जाऊन जबाब घेतला. या प्रकरणी दापाेली पाेलिसांनी सरपंच रवींद्र सातनाक यांच्यावर भारतीय दंड विधान कायदा कलम ३०७, ३८६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अधिक तपास पाेलिस उपनिरीक्षक यादव करीत आहेत.