सरपंच, ग्रामसेवकांनाही भात लावणीचा मोह आवरला नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:21 AM2021-07-08T04:21:56+5:302021-07-08T04:21:56+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील नवरंगवाडीतील माऊली महिला बचत गट हा एक आदर्श महिला गट ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : तालुक्यातील दहिवली बुद्रुक येथील नवरंगवाडीतील माऊली महिला बचत गट हा एक आदर्श महिला गट म्हणून ओळखला जातो. या गटातील महिला दरवर्षी भातशेती, भाजीपाला लागवड व मसाला, पापड आदी उप्तादनांचा व्यवसाय करतात. याहीवर्षी या गटाच्या महिलांनी चारसूत्री भातशेतीची लागवड केली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी भात लावणीची पाहणी करण्यास गेले असता त्यांनाही भात लावणीचा मोह आवरला नाही. सरपंच, उपसरपंच, ग्रामसेविका व सदस्यांनी गटातील महिलांच्या साथीने भात लावणी केली.
दहिवली नवरंग वाडीतील महिला बचत गट दरवर्षी भात शेती, भाजीपाला व इतर आदर्शवत व्यवसाय सातत्याने करत आहेत. विविध वस्तूंचे उत्पादन घेतल्यानंतर गटाच्या महिला या प्रदर्शन ठिकाणी सहभागी होऊन वस्तूंची विक्री करीत असतात. दहिवली परिसरात एक ॲक्टिव्ह गट म्हणून या गटाने आपली ओळख निर्माण केली आहे. भरीव भात उप्तादनासाठी यावर्षी बचत गटाच्या महिलांना चारसूत्री पद्धतीने लागवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नवरंगवाडी येथे भात लावणी सुरू होती.
चारसूत्रीची पाहणी व मार्गदर्शन करण्यासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आले होते. यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुहास पांचाळ, कृषी विस्तार अधिकारी पाटील, बचत गट प्रवर्तक जाधव, ग्रामसेविका साधना शेजवळ, माजी सरपंच दाजी तांबिटकर, माऊली महिला बचत गटातील महिला, अनिल खाडे आदीजण लावणी करण्यात दंग झाले होते. कृषी अधिकारी पाटील यांनी माऊली महिला बचत गटाच्या शेती कामाचे कौतुक करीत, व्यावसायिक शेती करण्याचे आवाहन केले.