शिक्षणाच्या प्रबळ इच्छेने सरपंचबाई झाल्या दहावी पास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 04:26 PM2022-08-01T16:26:20+5:302022-08-01T16:26:50+5:30
आपले सहकारी शिक्षित आणि आपले शिक्षण कमी याचे शल्य टोचत राहिल्याने त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काैटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि ५२ टक्के गुणही मिळविले.
मेहरून नाकाडे
रत्नागिरी : शिक्षणाची ओढ आणि आवड असेल तर शिक्षणासाठी वयाचे बंधन नसतेच, हे दाखवून दिले आहे भातगाव (ता. रत्नागिरी) येथील सरपंच रेणुका सागर आग्रे यांनी. आपले सहकारी शिक्षित आणि आपले शिक्षण कमी याचे शल्य टोचत राहिल्याने त्यांनी यावर्षी दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. काैटुंबिक जबाबदारी सांभाळत त्यांनी परीक्षा दिली आणि ५२ टक्के गुणही मिळविले.
काैटुंबिक जबाबदारी व परिस्थितीमुळे रेणुका यांना २००३ साली सातवीनंतर शिक्षण थांबवावे लागले. २०११ साली भातगाव गोळेवाडी येथील सागर महादेव आग्रे यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतरही त्या कुटुंबाच्या जबाबदारीत व्यस्त झाल्या. पतीचा रंगकामाचा व्यवसाय. त्यांना एक मुलगा व एक मुलगी, सासू, सासरे व पती मिळून त्यांच्या कुटुंबात एकूण सहा व्यक्ती आहेत. सहाजणांचे कुटुंब तसेच घरची शेती, त्यामुळे पहाटे ४ वाजल्यापासून दिनक्रम सुरू होतो.
भातगाव ग्रामपंचायतीच्या २०२१ साली निवडणुकीत त्या सरपंचपदी विराजमान झाल्या. गावाच्या प्रथम नागरिकाचा सन्मान प्राप्त झाला असला तरी सोबतचे सहकारी शिक्षित आहेत. गावाचा कारभार चालवायचा म्हटलं तर आपणही शिकले पाहिजे, असे राहून राहून वाटायला लागले. त्यांनी पती सागर व सासरे महादेव यांचेकडे शिकण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी या निर्णयाचे स्वागत करून पाठिंबा दिला.
पतीसाेबत मिरजोळी हायस्कूल येथे १७ नंबरचा फाॅर्म भरला. दर शनिवारी त्यांना शाळेत जावे लागे. शाळेतून आल्यावर त्यांना आठवडाभराचा दिलेला गृहपाठ, अभ्यास न चुकता पूर्ण करावा लागे. लहान मुले व कुटुंबातील अन्य घटकांमुळे स्वयंपाकापासून अन्य सर्व कामे आटोपून अभ्यासाला बसावे लागे. घरातील कामे, ग्रामपंचायतीची जबाबदारी यामुळे रात्री ११ ते मध्यरात्री दोन वाजेपर्यंत त्या अभ्यासाला वेळ देत. परीक्षेला आबलोली केंद्र आले आणि केंद्रावर साेडणे-आणणे यासाठी पतीची मदत झाली. आता त्यांनी पुढे बारावी करून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.