वाटदच्या सरपंच दाेन महिन्यांतच पुन्हा शिवसेनेत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:32 AM2021-04-07T04:32:22+5:302021-04-07T04:32:22+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : तालुक्यातील वाटद ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजली विभुते यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : तालुक्यातील वाटद ग्रामपंचायतीच्या सरपंच अंजली विभुते यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अवघ्या दोन महिन्यांतच पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अनपेक्षितपणे शिवसेनेच्या ताब्यातून गेलेली वाटद ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेच्या ताब्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत वाटद ग्रामपंचायतीमध्ये सरपंच निवडणुकीत धक्कादायक निकाल समोर आला. या ग्रामपंचायतीमधील ११ पैकी ७ जागा शिवसेनेकडे तर ४ जागा भाजपकडे आल्या हाेत्या. वाटद ग्रामपंचायतीमध्ये काठावरचे बहुमत असताना भाजपने या ठिकाणी शिवसेनेचे दोन सदस्य गळाला लावले आणि त्यांच्या मदतीने या ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता मिळविली होती. सरपंचपदी अंजली विभुते तर उपसरपंचपदी सुप्रिया नलावडे या विराजमान झाल्या होत्या. मात्र, अवघ्या दोनच महिन्यांत अंजली विभुते यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, तालुकाप्रमुख प्रदीप साळवी आणि इतर पदाधिकारी यांनी मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली वाटद ग्रामपंचायत पुन्हा शिवसेनेकडे वळवण्यात यश मिळवले असून, शिवसेनेच्या या रणनीतीने भाजपला मोठा धक्का बसला आहे.