कुवारबाव ग्रामपंचायतीच्या वाढीव पाणीपट्टीविराेधात सरपंचांचे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:19 AM2021-07-05T04:19:59+5:302021-07-05T04:19:59+5:30
रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या वाढीव पाणीपट्टीला गाव विकास आघाडीच्या सदस्यांनी कडाडून विराेध केला आहे. पुढील मासिक सभेत याबाबत ...
रत्नागिरी : तालुक्यातील कुवारबाव ग्रामपंचायतीच्या वाढीव पाणीपट्टीला गाव विकास आघाडीच्या सदस्यांनी कडाडून विराेध केला आहे. पुढील मासिक सभेत याबाबत फेरविचार न केल्यास १० जुलै राेजी ग्रामपंचायतीसमाेर उपाेषणाला बसणार असल्याची माहिती सरपंच मंजिरी पाडळकर, ग्रामपंचायत सदस्य आणि गाव विकास आघाडीचे समन्वयक सतेज नलावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या ठरावाला पाठिंबा देणाऱ्या सदस्यांच्याही घरासमाेर आंदाेलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपच्या जिल्हा संपर्क कार्यालयात आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी सतेज नलावडे यांनी सांगितले की, ग्रामपंचायतीमधील १५ सदस्यांपैकी गाव विकास आघाडीचे ८ सदस्य व सरपंच होते. आता ४ सदस्य व सरपंच राहिले आहेत. त्यामुळे बहुमत शिवसेनेकडे असून, वाढीव पाणीपट्टीचा विषय त्यांनीच मांडला व बहुमताने मंजूर केला आहे. पूर्वी युनिटचा दर १६ रुपये होता. आता तो ३५ रुपये झाला आहे. याला सर्वांचा विरोध असून, आतापर्यंत २५०हून अधिक कुटुंबांनी आपला विरोध दर्शवला आहे. पुढच्या टप्प्यात ज्या सदस्यांनी पाणीपट्टी वाढीसाठी ठरावाला मतदान केले त्यांच्या घरासमोरही उपोषणाचा इशारा दिला आहे.
१४ व्या वित्त आयोगातून ४९ लाख रुपये मंजूर झाले होते, परंतु ते २१ लाख करण्यात आले. सरपंच शिवसेनेमध्ये प्रवेश करत नसल्याच्या रागातून हे राजकारण केले जात असल्याचा आरोपही नलावडे यांनी केला. सौरऊर्जा माजी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी २०१९मध्ये मंजूर करून घेतली. जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांच्या मार्गदर्शनाखाली ती मी मंजूर करून घेतली आहे. परंतु, कुवारबावमध्ये सत्ता मिळवता न आल्यामुळे ती विरोधकांनी दोन वर्षे अडवून ठेवली. त्यानंतर उपोषणाचा इशारा दिल्यानंतर बशीर मुर्तुझा व नारायण खोराटे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांचे शिफारसपत्र आणले.
नलावडे यांनी सांगितले की, शिवसेनेचे सर्व सदस्य दरवाढीचे समर्थन करत आहेत. त्यांच्या पंचायत समिती सदस्य या दरवाढीला विरोध करत पत्र देतात. त्यांचे नेते सोशल मीडियावर दरवाढीचा विरोध करतात, हा विरोधाभास का? गावविकास आघाडीचे सदस्य कमी आहेत म्हणून कमकुवत समजू नका. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश मांडवकर, अनुश्री आपटे, प्राजक्ता चाळके यांच्यासमवेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस राजेश सावंत, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे आणि विजय सालीम उपस्थित होते.