चिपळुणात कातकरी समाजाचे ‘बांधण’ धरणे सत्याग्रह आंदोलन
By संदीप बांद्रे | Published: December 12, 2022 06:57 PM2022-12-12T18:57:38+5:302022-12-12T18:58:33+5:30
चिपळूण : वाशिष्ठी नदीला सती येथे येऊन मिळणाऱ्या नदीजवळ असलेल्या पुलाच्या ठिकाणी सोमवारी (१२ डिसेंबर) दिवसभर आदिवासी आदिम कातकरी ...
चिपळूण : वाशिष्ठी नदीला सती येथे येऊन मिळणाऱ्या नदीजवळ असलेल्या पुलाच्या ठिकाणी सोमवारी (१२ डिसेंबर) दिवसभर आदिवासी आदिम कातकरी संघटना, श्रमिक सहयोग, राष्ट्र सेवा दल, जन आंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय संघटनांनी एकदिवसीय ‘बांधण’ धरणे सत्याग्रह आंदोलन केले. यावेळी ‘बांधण वाचवा, आदिवासी वाचवा’, ‘हक्काचे आमचे मासे, टाकू नका जेसीबीचे फासे’ अशा घोषणा दिल्या.
मागील महिन्यात २१ नोव्हेंबर रोजी सती नदीमध्ये गाळ उपसा कार्यक्रमांतर्गत जलसंपदा विभागाचे जेसीबी उतरवण्यात आले. यामध्ये कातकरी समाजाचे चौदा बांधण उद्ध्वस्त केले गेले. हा एक बांधण तयार करायला २५ ते २७ हजार रुपये खर्च येतो. प्रत्यक्ष बांधण उद्ध्वस्त होत असताना उपस्थित कातकरी कुटुंबाने विनंती करूनही काम थांबवण्यात आले नव्हते.
उद्ध्वस्त केलेल्या ‘बांधण’ची नुकसान भरपाई देण्यात यावी, बांधण असलेल्या ठिकाणी सर्व्हेक्षण होऊन त्या ठिकाणांना संरक्षण मिळावे, गाळ उपसा कार्यक्रमापूर्वी स्वायत्त पर्यावरणीय संस्थेमार्फत नदीचा अभ्यास व्हावा व या अभ्यासामध्ये स्थानिक मासेमार आणि आदिवासी समाजाचे मत प्राधान्याने लक्षात घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी आदिवासी आदिम कातकरी संघटना तालुकाध्यक्ष संजय जगताप, संजय जाधव, तालुका सचिव महेश जाधव, जिल्हा सचिव चंद्रकांत जाधव, सुरेश पवार, विजया निकम, केतन निकम, सँच्युरी एशियाचे प्रकल्प समन्वयक मल्हार इंदुलकर, श्रमिक सहयोगचे राजन इंदुलकर, डीबीजे महाविद्यालयाचे प्रा. राम साळवी, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचे सचिव धीरज वाटेकर, महेंद्रगिरी निसर्ग मित्रचे अध्यक्ष अनिकेत चोपडे उपस्थित होते.