सौरभची शिमगाेत्सवातील गावची भेट शेवटची, किरकोळ वादातून पुण्यात झाला खून
By संदीप बांद्रे | Published: March 22, 2023 06:46 PM2023-03-22T18:46:19+5:302023-03-22T18:46:53+5:30
त्याचा खून झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला
संदीप बांद्रे
चिपळूण : तालुक्यातील वालाेपे- मयेकरवाडी येथील साैरभ मयेकर हा पुणे येथे एका कंपनीत इलेक्ट्रिशियन म्हणून कामाला होता. शिमगाेत्सवाला ताे आपल्या गावी आला हाेता. मागील आठवड्यात ताे पुण्यात निघून गेला हाेता. मात्र, त्याचा खून झाल्याचा धक्कादायक प्रकार समाेर येताच कुटुंबीयांना धक्काच बसला. शिमगाेत्सवासाठी गावी आलेल्या साैरभची ती शेवटची गाव भेट ठरली.
तालुक्यातील वालोपे येथील तरुणाचा पुण्यात खून झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी पुण्यात धाव घेतली. सौरभ तळेगाव दाभाडे येथे नोकरीनिमित्त वास्तव्याला होता. सोमवारी रात्री किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. किरकोळ भांडणाचा बदला घेण्यासाठी तिघांनी सौरभचे अपहरण केले. तसेच त्याला सातेगावच्या हद्दीतील ओढ्यात नेऊन डोक्यात दगड मारून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याप्रकरणी सक्षम शंकर आनंदे (१८, रा. व्हिजन सिटी, जांभूळ) व दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन अल्पवयीन आरोपींमधील एकजण जांभूळ तर दुसरा वडगाव माळीनगर येथील रहिवासी आहे. सौरभचे माध्यमिक शिक्षण पेढे येथे झाले होते. पुढे त्याने रिगल महाविद्यालयात आयटीआयचे शिक्षण घेतले. मात्र, त्याचा खून झाल्याने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. त्याच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व बहीण असा परिवार आहे.
शेतीच्या कामात रमणारा सौरभ
सौरभला शेतीच्या कामाची प्रचंड आवड होती. शेतात पॉवर ट्रिलर चालवण्यात त्याचा हातखंडा होता. शिक्षण सुरू असताना तो नांगरणीची कामे करीत असे. या कामासाठी तो वालोपे पंचक्रोशीत प्रसिद्ध होता. मात्र, नोकरीनिमित्ताने त्याला अचानक पुण्यात जावे लागले. इलेक्ट्रिशियनच्या कामात तो रमला होता.