देवरुखनजीक विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 11:45 AM2020-05-19T11:45:38+5:302020-05-19T11:48:09+5:30
सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवरुखनजीकच्या माळवाशी येथे घडली आहे. एक वर्षाच्या या मादी बिबट्याला देवरुख वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल विहिरीतून सुखरुप बाहेर काढत अज्ञातवासात सोडून दिले आहे.
देवरुख : सावजाचा पाठलाग करताना बिबट्या विहिरीत पडल्याची घटना सोमवारी सायंकाळी देवरुखनजीकच्या माळवाशी येथे घडली आहे. एक वर्षाच्या या मादी बिबट्याला देवरुख वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने खोल विहिरीतून सुखरुप बाहेर काढत अज्ञातवासात सोडून दिले आहे.
वाशी येथील ग्रामस्थ संतोष जाधव यांनी बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती देवरुख वन विभागाला दिली. देवरुखनजीकच्या माळवाशी येथे संदीप चाळके यांचे हिल पॉईंट हे हॉटेल आहे. या हॉटेलनजीक पाण्याची मोठी विहीर आहे.
नेहमीप्रमाणे सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास जाधव हे विहिरीजवळील पाण्याची मशीन सुरू करण्यासाठी गेले असता, विहिरीतील पाण्यात बिबट्या पडल्याचे त्यांना दिसले. त्यांनी वन विभागाला या घटनेची माहिती दिली.
त्यानंतर वन विभागाचे अधिकारी आर. सी. भवर, परिक्षेत्र वन अधिकारी प्रियंका लगट यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक नानू गावडे, शर्वरी कदम, संतोष कदम, दिनेश गुरव ६ वाजण्याच्या सुमाराला घटनास्थळी आले.
यावेळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने साधारण ४० फूट खोल असणाऱ्या विहिरीत जाळी टाकून बिबट्याला विहिरीच्या काठावर सुखरुप आणले.
दरम्यान, हा बिबट्या सावजाच्या शोधात असताना, त्याची झेप जाऊन तो विहिरीत पडला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला.
हा बिबट्या मादी जातीचा आणि १ वर्षाचा असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. या बिबट्याला रात्री ७.३० वाजता विहिरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर रात्री नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.