Ratnagiri Crime: खवले मांजराची खवले जप्त, मंडणगडात पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात; एकजण फरार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 02:18 PM2023-01-02T14:18:50+5:302023-01-02T14:19:15+5:30
लाटवण- दापोली मार्गावरील घाटात ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आली कारवाई
रत्नागिरी : खवले मांजराच्या खवल्यांची विक्रीसाठी तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत खवले मांजराच्या खवल्यांसह तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कारवाई मंडणगड पोलिस स्थानकाच्या हद्दीतील लाटवण- दापोली मार्गावरील घाटात ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री करण्यात आली.
खेडचे पोलिस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांनी मंडणगडचे वनपाल, खेड व मंडणगड पोलिसस्थानक यांचे संयुक्त पथक तयार करून ही कारवाई केली. लाटवण- दापोली मार्गावरील घाटात खवले मांजराच्या खवल्यांची विक्री होणार असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे घाटात सापळा रचण्यात आला. या घाटातून एका दुचाकीवरून तिघे संशयितरित्या जाताना पथकाने पाहिले. त्यांना थांबवून त्यांची झडती केली असता, त्यांच्याकडे असणाऱ्या एका पिशवीत खवले मांजराची ४.३७२ किलो वजनाची खवले सापडले.
याचदरम्यान आणखी एक संशयित व्यक्ती चारचाकी वाहनासह तिथे आला होता. मात्र, पोलिसांना पाहून त्याने तिथून पलायन केले. त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला.
या कारवाईत तिघांवर वन्य जीव (संरक्षण) अधिनियम १९७२चे कलम २, ९, ३९ (२), ४८, ४९, व ५१ प्रमाणे मंडणगड पोलिसस्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत दुचाकी व मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
एक जण फरार
या गुन्ह्यामधील वन्यजीवी प्राण्याची (खवले मांजराची) हत्या/शिकार कोठे झाली आहे? तसेच अन्य फरार व्यक्तीला शोधण्याबाबत अधिक तपास करण्यात येत आहे. फरार झालेली व्यक्ती खवले मांजर खरेदीसाठी आल्याचा संशय व्यक्त होत आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी आता तपास सुरू केला आहे.