टंचाई कृती आराखडा दीड कोटीने घटला
By admin | Published: February 12, 2016 10:21 PM2016-02-12T22:21:54+5:302016-02-12T23:44:27+5:30
पाणीपुरवठा : बंधाऱ्यांवर भिस्त, योजना दुरुस्तीकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : वनराई बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईची तीव्रता काही अंशी कमी होणार असल्याने जिल्हा परिषदेच्या संभाव्य पाणीटंचाई आराखड्यात यंदा १ कोटी ४0 लाखांची घट झाली आहे. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्ह्याचा ३५ लाख ९० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला आहे. मात्र त्यात नादुरूस्त योजनांच्या दुरूस्तीचा समावेशच करण्यात आलेला नाही.
पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. या आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात १५८ गावातील २९९ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी २८ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यात केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
या आराखड्यानुसार नवीन विंधन विहिरी, विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे व नळपाणी योजना दुरुस्तीवर यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही.
सन २०१४-१५चा १ कोटी ७६ लाख २० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा १९० गावांतील ४१८ वाड्यांचा तयार करण्यात आला होता. त्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आली होती. प्रत्यक्ष टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ६३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, टंचाईच्या कालावधीत टंचाईग्रस्तांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४९ लाख रुपये खर्च आला होता. मात्र, यंदा पाणीटंचाईचा आराखडा ३५ लाख ९० हजार रुपयांचा करण्यात आला असून, तो गतवर्षीपेक्षा १ कोटी ४० लाख रुपयांनी कमी आहे. कारण यंदाच्या आराखड्यामध्ये नळपाणी योजना दुरुस्तीची कामे घेण्यात आलेली नाहीत. तसेच यंदा संभाव्य टंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. कारण गेल्या तीन महिन्यामध्ये सुमारे ४५०० वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यामुळे पाणीटंचाई घटण्याची अपेक्षा आहे. (शहर वार्ताहर)
बंधारे परिणामकारक : ग्रामीण भागात पाणी पातळीत वाढ
जिल्हा परिषदेने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन यावर्षी बंधारे मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्यात आतापर्यंत ४ हजार ५०० बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे दरवर्षीपेक्षा यावर्षी पाणीटंचाईची झळ अधिक तीव्रपणे बसणार नसल्याचे दिसत आहे.
तालुकागावेवाड्या
मंडणगड३४
दापोली२८४३
खेड२५४३
गुहागर११४०
चिपळूण२५४९
संगमेश्वर२८३४
रत्नागिरी१७३५
लांजा ९१६
राजापूर१२३५
एकूण१५८२९९