‘एआरटी सेंटर’मध्ये औषधांचा तुटवडा

By admin | Published: May 2, 2016 11:21 PM2016-05-02T23:21:47+5:302016-05-03T00:53:07+5:30

एड्सग्रस्तांसमोर समस्या : गुरुप्रसाद ट्रस्टतर्फे आज मूकमोर्चा

Scarcity of medicines in 'ART Center' | ‘एआरटी सेंटर’मध्ये औषधांचा तुटवडा

‘एआरटी सेंटर’मध्ये औषधांचा तुटवडा

Next

रत्नागिरी : महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात एड्स प्रतिबंधक उपचार केंद्राला (ए. आर. टी. सेंटर) औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याची झळ येथील जिल्हा शासकीय रुग्णालयाला मोठ्या प्रमाणावर बसली असून, एड्सग्रस्तांचे आयुष्य धोक्यात आले आहे. शासनाचे लक्ष या बाबीकडे वेधून घेण्यासाठी उद्या मंगळवारी येथील गुरूप्रसाद ट्रस्टतर्फे जिल्ह्यातील एच. आय. व्ही. संसर्गित व्यक्तिंचा मूक मोर्चा जिल्हा शासकीय रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान काढण्यात येणार आहे.
शासनस्तरावर एड्स या महाभयंकर रोगाबाबत जागृती होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. एच. आय. व्ही. बाधितांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी शासकीय रूग्णालयांतर्गत चालवण्यात येणाऱ्या एड्स प्रतिबंधक उपचार केंद्रातून या रूग्णांना झेडएलएन टीएलई आणि झेडएल गोळ्या व इतर औषधे पुरविण्यात येतात. या औषधांचा पुरवठा महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंंबई (एम सॅक) यांच्याकडून केला जातो. मात्र, यापैकी झेडएल या गोळ्यांचा तुटवडा गेल्या सहा महिन्यांपासून जाणवू लागला असल्याने या गोळ्यांच्या दुप्पट प्रभाव असलेली झेडएलएन टीएलई ही गोळी सरसकट दिली जात आहे. मात्र, ही गोळी रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या रूग्णांना दिल्यास त्यांच्या पचनक्रियेकवर परिणाम होऊन मृत्यूदर वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
सध्या राज्यातील सर्वच ए. आर. टी. केंद्रांना या गोळ्यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे राज्यातील एक लाख ७० हजार रूग्णांचे जीवन धोक्यात आले आहे. मात्र, शासनाला याबाबत काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसत आहे. पुण्यातील एनएमपी प्लस या संस्थेने रूग्णांच्या जीविताला असलेला हा धोका लक्षात घेऊन या परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता उद्या ३ मे रोजी राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे.
एड्सग्रस्तांसाठी कार्यरत असलेल्या येथील गुरूप्रसाद टस्ट्रतर्फेही मंगळवारी जिल्ह्यातील एच. आय. व्ही. संसर्गित व्यक्तिंचा मूक मोर्चा जिल्हा शासकीय रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान काढण्यात येणार असून, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Scarcity of medicines in 'ART Center'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.