शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:33 AM2021-05-21T04:33:32+5:302021-05-21T04:33:32+5:30
रत्नागिरी : परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ...
रत्नागिरी : परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ५ वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ. ८ वी ही २३ मे २०२१ रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार होती; परंतु सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही परीक्षा तूर्त पुढे ढकलण्यात आली आहे.
काम वाटप समितीची सभा
जिल्हा परिषद रत्नागिरीचे काम वाटप समितीची सभा २१ व २२ मे रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवार २१ मे रोजी सुशिक्षीत बेरोजगार अभियंता (स्थापत्य) रत्नागिरी बांधकाम विभागाकडील तर २२ रोजी चिपळूण बांधकाम विभागाकडील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना कामाचे वाटप करण्यात येणार आहे.
संचारबंदीमुळे व्यवसायांवर परिणाम
देवरूख : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे उत्पन्न थांबले असून त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्याचबरोबर आता कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३१,६२२ बाधित सापडले आहेत तर आतापर्यंत २७,२७६ रुग्ण बरे होऊन आपल्या घरी गेले आहेत. बरे हाेण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांपेक्षा वाढले आहे.
इंधनाचे दर भडकले
चिपळूण : पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस आदी इंधनाचे दर वाढले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे. त्याचबरोबर आता खतांच्या किमतीही वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दारूबंदीचा बाेजवारा
रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या लाॅकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांना कुठल्याच कामासाठी बाहेर पडता येत नाही. मात्र, लाॅकडाऊन असुनही अनेक भागांमध्ये अवैध दारूधंदे खुलेआम सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
रस्ता खड्डेमय
गणपतीपुळे : सागरी किनारपट्टीवरील सुप्रसिद्ध देवस्थान म्हणून गणल्या जाणाऱ्या रामेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची सध्या दुरावस्था झाली आहे. हा रस्ता काही महिन्यांपूर्वी दुरूस्त करण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा त्याची दुरावस्था झाली आहे.
पाणीटंचाई वाढली
राजापूर : तालुक्यात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो तरीही उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाई सुरू होते. यावर्षी तालुक्यातही पाऊस चांगला झाला होता. मात्र, आता मे महिना उलटू लागताच पाणीटंचाईने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे.
मोबाईल दुकाने बंद
दापोली : जिल्हा प्रशासनाने १५ एप्रिलपासून लाॅकडाऊन सुरू केले आहे. त्यामुळे सर्वच दुकाने बंद आहेत. मात्र, सध्याच्या माहिती-तंत्रज्ञानाच्या जगात मोबाईलची महत्त्वाची भूमिका आहे; परंतु सध्या ही दुकाने बंद असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे.
विद्युत पुरवठा अनियमित
खेड : सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागरिक घरात बसलेले आहेत. त्यातच सतत वीज येत जात असल्याने नागरिक हैराण झाले आहे. सातत्याने लाईट जात असून पंखेही बंद होत आहेत. त्यामुळे नागरिकांना उकाड्याने हैराण व्हायला झाले आहे.