दिशान्तरतर्फे युवाशक्तीला एकवीस लाखांची शिष्यवृत्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:39 AM2021-06-09T04:39:08+5:302021-06-09T04:39:08+5:30
- शैक्षणिक साहित्यासह दप्तर, हजारो विद्यार्थ्यांना पुस्तके लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली ...
- शैक्षणिक साहित्यासह दप्तर, हजारो विद्यार्थ्यांना पुस्तके
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : कोकणच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता ठासून भरली आहे. डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यामुळे या मुलांना विपरीत परिस्थितीशी झुंजण्याचे अलौकिक बळदेखील निसर्गतः मिळाले आहे. गावकुसापासून दूरवरच्या वाड्यावस्त्या... त्या साऱ्या अडचणींच्या जंगलवाटा तुडवत शिक्षणासाठी चाललेली पायपीट... यातही कुणी अर्थ दुर्बल तर कुणी कौटुंबिक आधार गमावलेला, अशा साऱ्या देशाच्या भावी आधारस्तंभांना शिष्यवृत्तीतून सहकार्याचा स्नेहार्द हात देण्याचा उपक्रम दिशान्तर संस्थेने सुरू ठेवला असून, त्यायोगे २१ लाखांपेक्षा अधिक रक्कम देण्यात आली आहे.
माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहराकडे जाणे, डोनेशन, रोजचा प्रवास वा बाहेरगावी राहण्याचा खर्च अशा साऱ्यामुळे अंगी गुणवत्ता असूनही उच्चशिक्षण घेताना विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे येतात. गावकुसापासून दूरवर राहणाऱ्यांना जंगलवाटा तुडवत शाळेत यावे लागते. शिक्षणासाठी चाललेली पायपीट प्रसंगी सहन होते. दिशान्तर संस्थेला विद्यार्थ्यांची ही व्यथा लक्षात आली होती. यातूनच ज्ञानयज्ञ प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली. याचे तीन टप्पे आहेत. पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या, पेन, कंपास पेटी, परीक्षा पॅड, खाऊ डबा, पाणी बॉटल अशा शैक्षणिक साहित्यासह दप्तर देण्यात येते. कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कला, वाणिज्य, विज्ञान अशा तीन शाखांकरिता क्रमिक अभ्यासक्रमाची पुस्तके पेढी कॉलेजनिहाय उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. याच जोडीने काही विद्यार्थ्यांना एस.टी. पासेसही देण्यात आले. ज्ञानयज्ञच्या तिसऱ्या टप्प्यात शिष्यवृत्ती देण्यात येते. यावर्षी १२९ विद्यार्थ्यांना ७ लाख रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले आहे. यामुळे गत चार वर्षांत २१ लाख २ हजारांची रक्कम विद्यार्थ्यांना देण्यात दिशान्तरला यश आले आहे.