शाळा पोहोचली विद्यार्थ्यांच्या वाडी, वस्तीवर;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:20 AM2021-07-19T04:20:47+5:302021-07-19T04:20:47+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालये अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता टिकून राहावी, विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहावेत यासाठी सती चिंचघरी येथील न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा विद्यार्थ्यांच्या वाडी-वस्तीवर पोहाेचली आहे. शाळेतील शिक्षक थेट विद्यार्थ्यांच्या वाडीत जाऊन त्यांना शैक्षणिक धडे देत आहेत. सलग दुसऱ्या वर्षी हा उपक्रम या शाळेने सुरू ठेवला आहे.
सह्याद्री शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी -चिंचघरी (सती) विद्यालयाने शाळा आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. शिक्षक कोविड १९ नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांच्या घरात पोहोचून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने शाळा आपल्या दारी हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत वाडी-वस्तीमध्ये शिक्षक प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना येणाऱ्या विविध शंकांचे निरसन करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम करत आहेत. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
या शाळेत पूर्व पश्चिम विभागातील विद्यार्थ्यांची संख्याही जास्त आहे. काही दुर्गम भागात इंटरनेटची सुविधा नाही. त्यामुळे हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहू नये, याची दक्षता शाळेने घेतली आहे. येथील शिक्षक थेट विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना अभ्यासक्रमाचे धडे देत आहेत. गतवर्षीही शाळेने हा उपक्रम राबवला होता. या उपक्रमास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
------------------------
ग्रंथालयही वाडीवस्तीवर
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नियमित राहावी, यासाठी ग्रंथपाल जयंत पवार आणि कलाशिक्षक टी. एस. पाटील यांनी कलेसह ग्रंथालय वाडीवस्तीवर पोहोचवले आहे. शाळेच्या या प्रयत्नांमुळे विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहात राहण्यास मदत झाली. सती विद्यालयाच्या उपक्रमास पालकदेखील प्रतिसाद देतात.
180721\img-20210711-wa0122.jpg
शाळा पोहोचली विद्यार्थ्यांच्या वाडी, वस्तीवर
सती विद्यालयाचा उपक्रम